भूमाफिया टोळीचा मास्टर माईंड रम्मी राजपुतला कोठडी

आनंदवली येथील रमेश मंडलिक खूनप्रकरण

नाशिक : शहरातील आनंदवली येथील भूधारक रमेश मंडलिक यांचा कट रचून खून करणार्‍या आणि आठ महिन्यांपासून फरार असलेल्या भूमाफिया टोळीचा मास्टर माईंड व मुख्य आरोपी रम्मी राजपूतला हिमाचल प्रदेश व त्याच्या भावाला उत्तराखंड येथून नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. दोघांना गुरुवारी (दि.१०) न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

रम्मी परमजितसिंग राजपूत (वय ४०, रा. महात्मानगर, नाशिक) व जिम्मी परमजितसिंग राजपूत (वय ४२, रा.मुलुंड, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रमेश मंडलिक (वय ७०) या जमीन मालकाची १७ फेब्रुवारी २०२१ रोजी हत्या करण्यात आली होती. पुरावे समोर नसताना नाशिक शहर पोलिसांनी बारकाईने तपास करून या टोळीचा पर्दाफाश केला होता. खूनाच्या घटनेनंतर रम्मी राजपूत फरार झाला होता.

तो भूमाफिया टोळीचा मास्टर माईंड, मुख्य आरोपी असल्याचे तपासात समोर आले. तेव्हापासून नाशिक शहर पोलीस त्याच्या मागावर होते. तो चंदीगड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनीट एकचे पथक चंदीगडमध्ये दाखल झाले. पथकाने जिम्मी राजपुतला रामनगर, उत्तराखंड येथून अटक केली. पथकाने त्यास मुख्य सूत्रधार रम्मीबाबत विचारणा केली असता त्याने तो हिमाचल प्रदेशमधील जंगल परिसरात असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने राणीताला येथून रम्मीला अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ करत आहेत.