Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक महापौरांनी निवासस्थान न सोडत प्रशासनाला आव्हान दिले

महापौरांनी निवासस्थान न सोडत प्रशासनाला आव्हान दिले

Subscribe

कार्यकाळ संपल्यानंतरही महापौरांचा निवासस्थानावरील ताबा कायम

नाशिक : महापालिकेत सोमवार (दि. १४) पासून प्रशासकीय राजवटीला प्रारंभ झाला खरा; परंतु मावळते महापौर सतीश कुलकर्णी यांनी मात्र महापौरांचे निवासस्थान असलेले रामायण निवासस्थान न सोडून प्रशासनाला जणू आव्हानच दिले आहे. महापौर आणि प्रशासन यांच्यातील वादाच्या मालिकेचा हा पुढचा भाग असल्याचे मानले जात आहे. महापौरांकडून शासकीय निवासस्थानाचा वापर होत असेल तर त्याबाबत प्रशासन त्यांच्याकडून भाडेआकारणी करण्याची शक्यता आहे.
महापालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांचा कार्यकाळ १३ मार्चला रात्री बारा वाजेनंतर संपुष्टात आला.

परिणामी तब्बल ३० वर्षांनंतर महापालिकेत सोमवार(दि.१४) पासून प्रशासकीय राजवट सुरु झाली. राज्याचे नगरविकास विभागाने यापुर्वीच आयुक्त कैलास जाधव यांची प्रशासक पदी नियुक्ती केली आहे. आता यापुढे प्रशासक म्हणूनच प्रत्येक कागदावर मोहोर उमटणार आहे. अंदाजपत्रकातील कामे करण्यासाठी विभाग प्रमुखांकडून प्रस्ताव प्रशासकांना सादर केले जातील. नगरसचिवांकडून प्रस्तावाचे ठरावात रुपांतर होईल. महत्वाचे म्हणजे महापौर पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरही सतीश कुलकर्णी हे महापौर निवासस्थान ‘रामायण’चा वापर करणार आहेत. विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी नगरसेवकांचा प्रतिनिधी म्हणून महापौर या नात्याने रामायण येथे आपल्याला काही दिवस थांबणे गरजेचे असल्याचे महापौरांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

तर कार्यकाळ संपुष्टात आल्याने शासकीय निवासस्थानाचा महापौरांना वापर करता येणार नसल्याची प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे उपायुक्तांना मुद्रा वापरण्याचे अधिकार महापालिकेची मुद्रा वापरण्यासाठी वर्ग दोनच्या अधिकाजयांची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिका व अन्य संस्थांमध्ये होणारे करार करण्यासाठी या मुद्रेचा वापर केली जाईल. स्थायी समिती अस्तित्वात असताना या मुद्रेचा वापर होतो. मात्र आता प्रशासकीय राजवटीत मुद्रेचा वापर करण्यासाठी उपायुक्त दर्जाच्या दोन अधिकाजयांची नियुक्ती केली जाणार आहे.

आजपासून प्रशासकांचे कामकाज

प्रशासक तथा आयुक्त सोमवारी विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत असल्याने दिवसभर ते मुख्यालयात उपस्थित नव्हते. मंगळवार(दि.१५)पासून प्रशासक म्हणून ते रितसर कामकाजाला
सुरूवात करतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पंचवार्षिकच्या शेवटच्या टप्प्यात प्रभागांतील विकासकामांचे अनेक प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यासंदर्भात नगरसेवकांकडून महापौर या नात्याने आपल्याला सातत्याने विचारणा होत असल्यामुळे या कामांसंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. त्यासाठीच १४ मार्चनंतरही काही दिवस आपण ‘महापौर निवासस्थाना’त उपलब्ध राहू असे गत महासभेत जाहीर केले होते. महापौर निवासस्थान हे शासकीय कार्यालय नसल्याने नागरिकांसाठी महापौर या नात्याने आपण याठिकाणी काही दिवस थांबणार आहोत. तसे लेखी पत्र आपण आयुक्त कैलास जाधव यांना पाठविले आहे. – सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक.

- Advertisement -
- Advertisement -
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -