नाशकात कोरोना रुग्णांचे रोज नवे उच्चांक

दिवसभरात ५३८ नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

What happens if both Corona and Influenza infections occur at the same time? Read the answer to 'WHO'

नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नवीन वर्षात दररोज उच्चांकी रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. गुरुवारी (दि.६) दिवसभरात ५३८ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक शहर ४१९, नाशिक ग्रामीण ८७, मालेगाव ८ आणि जिल्ह्याबाहेरील २४ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात नाशिक शहरातील दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात १३० रुग्ण बरे झाले.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिक जिल्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आला आहे. जिल्ह्यात १ हजार ८६७ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये नाशिक शहर १ हजार ४५७, नाशिक ग्रामीण ३३२, मालेगाव १८ आणि जिल्ह्याबाहेरील ६० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ९७ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात एकूण ४ लाख १५ हजार ८०१ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख ५ हजार १७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात एकूण ८ हजार ७६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक शहर ४ हजार २९, नाशिक ग्रामीण ४ हजार २५०, मालेगाव ३५८ आणि जिल्ह्याबाहेरील १२६ रुग्णांचा समावेश आहे. १ हजार ८६७ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय १०, नाशिक महापालिका रुग्णालय १ हजार ५०३, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ४, मालेगाव रुग्णालय १८ आणि नाशिक ग्रामीण रुग्णालयात ३३२ रुग्ण उपचार घेत आहेत.

२२३० अहवाल प्रलंबित

कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपर्कात आलेल्या संशयितांचा शोध आरोग्य विभाग घेत आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयित २ हजार २३० रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असून, ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. संशयितांमध्ये नाशिक शहर ४४४, नाशिक ग्रामीण १ हजार ६१९, मालेगावातील १६७ आहेत.