नाशिक : शहरात महिनाभरापासून डोळ्यांची साथ असून, विशेषतः लहान मुलांमध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व उद्याने पुढील १५ दिवस म्हणजे १८ ते ३१ ऑगस्टदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर शहरात साडेपाच हजार रूग्ण आढळून आले आहेत. ही रूग्णसंख्या नियंत्रणासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
पावसाळ्यामुळे डेंग्यू, मलेरियासोबतच डोळे येण्याच्या साथीने डोके वर काढले आहे. यामुळे रूग्णालयांमध्ये त्रस्त रूग्णांची संख्या वाढत असून, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. विशेष करून पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण येणार्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. जिल्हा रुग्णालयात डोळे तपासणी करण्यासाठी येणार्यांची संख्यादेखील वाढली असून, डोळे येण्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. अनेक विद्यार्थी डोळे येण्याच्या आजाराने ग्रासले असल्याने शाळांमधील उपस्थितीवर परिणाम झाला आहे.
शहरातील अनेक शाळांनी डोळ्यांचा त्रास होणार्या विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यास सुरुवात केली असून याचा परिणाम शाळांमधील उपस्थितीवर होत आहे तर, शालेय वाहतुकीच्या वाहनातून प्रवास करणार्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली असल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेता आता पालिकेच्या वृक्ष व प्राधिकरण विभागाने शहरातील सर्व उद्याने १८ ते ३१ ऑगस्टदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळयात उद्याने बंदच असतात. परंतु, सध्या पाऊस नसल्याने उद्याने खुली आहेत. सायंकाळी उद्यानांमध्ये मुलांची गर्दी होत असल्याने संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : सावधान! नाशिकमध्ये डोळ्यांची साथ, रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ; ‘अशी’ घ्या काळजी