शरीरसुखासाठी प्रियकराच्या वडिलांनीच टाकला दबाव; गर्भपातासाठी प्रियकराचा प्रयत्न

 बापलेकांना अटक

rape

लग्नाचे आमिष दाखवत प्रियकराने महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, महिला गर्भवती असल्याचे समजताच प्रियकराने तिला बाळ नको, तू गर्भपात करुन टाकण्यास सांगितले. तर प्रियकराच्या वडिलांनी पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित सचिन नानाजी खैरनार (वय २६, रा.श्रमिकनगर, सातपूर), नानाजी खैरनार (वय ४२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला व सचिन खैरनार हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सचिनने महिलेशी ओळख वाढवत मैत्री केली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. त्याने १५ एप्रिल ते ९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत राहत्या घरी व देवळाली कॅम्पमधील भाड्याच्या रुममध्ये वारंवार बलात्कार केला. प्रसंगी तिला त्याने शिवीगाळ व मारहाणसुद्धा केली. त्यातून ती गर्भवती राहिली. ही बाब त्याला समजताच त्याने बाळ नको आहे, तू गर्भपात करुन टाक, असे सांगितले. त्यानंतर त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करणे सुरु केले. ३ मे २०२१ रोजी सचिनचे वडील नानाजी खैरनार याने पीडित महिलेला माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, तुला पैसे देतो, असे म्हणत विनयभंग केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.