पाऊस आला धावून, पूल गेला वाहून

नाशिक : वणी परिसरातील सप्तशृंग गडाकडे पायवाटेने जाणार्‍या वणी-चंडीकापुर मार्गावर असलेल्या पुलावरील फरशी वाहून गेली आहे. दोन भागांचा संपर्क तुटल्याने स्थानिक शेतकर्‍यांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दिंडोरी तालुक्यात पावसाने रस्ते, पूल, बांध यांसह नदीपात्राचीही वाताहात लावली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानीच्या स्थळांवर प्रशासन अद्याप पोहोचलेले नाही. नुकसानीचा आवाका व मनुष्यबळावर असलेल्या मर्यादा लक्षात घेता अधिकारी व कर्मचारी यांनाही हे आव्हान पेलणे अवघड दिसते आहे.

त्यातच रस्त्यांचा प्रश्नही आता बिकट बनला आहे. सप्तशृंगगडावर वणी चंडीकापूरमार्गे वणी येथून पायी जाण्यासाठी एक रस्ता आहे. त्या रस्त्यावर एका ठिकाणी पुल व त्यावर फरशी असुन, पुलाखालुन पाण्याचा प्रवाह वाहुन जाण्यासाठी खाली पाईप टाकले आहेत. या रस्त्यावरुन दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. मात्र, फरशी वाहुन गेल्याने चारचाकी वाहन त्यावरुन जात नाही. त्यामुळे स्थानिकांना नाईलाजास्तव दुचाकीवरुन जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची तक्रार राकेश थोरात व अनिल थोरात यांनी दिली.

सध्या शेतीकामाचा हंगाम असुन, साहित्याची वाहतूक ठप्प झाल्याने शेतीकामाची गती मंदावली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन सदर पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी जगदंबा देवी संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र थोरात व सुनील थोरात यांनी केली आहे.