घरमहाराष्ट्रनाशिकअंबड-सातपूर एमआयडीसीला जोडणारा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

अंबड-सातपूर एमआयडीसीला जोडणारा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

Subscribe

राजेंद्र भांड । अंबड

सातपूर- अंबड औद्योगिक वसाहतीला जोडणारा मुख्य रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. डीजीपी नगर क्रमांक 2 परिसरातील संत गजानन महाराज चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते व भीषण अपघात होत असतात. परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी याबाबत पोलीस प्रशासनाला कळवूनदेखील कुठलीही दखल घेतली जात नसल्यामुळे वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत प्रशासन सुविधा देण्यास कुचकामी ठरत असल्याचे या रस्त्याकडे बघून दिसते..

- Advertisement -

नाशिक शहराला अंबड, सातपूर, गोंदे या तीन औद्योगिक वसाहती लाभल्या आहेत. त्यापैकी अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत लहान मोठ्या 3 हजार 500 कंपन्या आहेत. रोज लाखोच्या संख्येने कामगार दोन्ही सत्रामध्ये कामावर जातात.
औद्योगिक वसाहतीकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने दिवसभर या रस्त्याने मोठ्या प्रमाणात मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पंचवटी, म्हसरूळ, नाशिक रोड, सिडको वसाहत, महात्मा नगर खुटवडनगर, त्रिमूर्ती चौक. यासह छोटे मोठे रस्ते या रस्त्याला येऊन मिळतात. या रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी रुंदीकरण झाले असून अजूनही दुभाजक टाकले नसल्यामुळे वाहन चालक अचानकपणे विरुद्ध दिशेने वाहने चालवतात. त्यामुळे समोरील वाहन चालकाची त्रेधातिरपीट उडून गंभीर अपघात होत आहेत.

अवजड वाहनांना या रस्त्याने बंदी करावी अशी मागणी वाहन चालक व रहिवाशांनी केली आहे. या परिसरात बँका, मंगल कार्यालये असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अपघात झाल्यास मोठी तारांबळ उडते. या परिसरात सिग्नल यंत्रणा उभारून ती त्वरित कार्यांन्वीत करण्यात यावी, तसेच कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची गजानन महाराज चौका नेमणूक करावी अशी मागणी होत आहे. या मुख्य रस्त्यावरून कायमच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, खासदार आमदार माजी नगरसेवक विविध दौरे कार्यक्रमानिमित्त राबता असतो. तरीदेखील त्यांना या रस्त्यावरची वाहतूक कोंडी व अपघात प्रवर क्षेत्र दिसत नाही, याचे सर्वसामान्यांना नवल वाटते.

- Advertisement -

पोलीस चौकीच्या मागणीकडे १० वर्षांपासून दुर्लक्ष

डीजीपी नगर क्रमांक 2, वृंदावन नगर, कामटवाडे, विखे पाटील शाळा परिसर, बंदावणे नगर, महालक्ष्मी नगर, स्वामी नगर, वनश्री कॉलनी, गुलमोहर कॉलनी, मुरारी नगर, आम्रपाली लॉन्स परिसरात नवीन वसाहती वाढत आहेत. डीजीपी नगर क्रमांक 2 परिसरात पोलीस चौकी व्हावी अशी मागणी दहा वर्षापासून येथील नागरिक करत आहेत. तरीदेखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. हा मुख्य रस्ता असल्यामुळे रात्री-बे रात्री अपघात वा तत्सम अन्य घटना घडल्यास जबाबदारी कोणावर टाकायची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -