काँग्रेस प्रवक्ता डॉ. पाटील यांच्या घरातून १५ लाखांच्या सोन्याच्या बिस्कीटांची चोरी

काँग्रेस प्रवक्ता तथा नगरसेविका डॉ. हेमलता निनाद पाटील यांच्या टिळकवाडी येथील बंगल्यातून १५ लाख रुपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे चोरी झाल्याची घटना बुधवारी (१३ फेब्रुवारी) रात्री उघडकीस आली.

Golden Bricks
प्रातिनिधीक फोटो

काँग्रेस प्रवक्ता तथा नगरसेविका डॉ. हेमलता निनाद पाटील यांच्या टिळकवाडी येथील बंगल्यातून १५ लाख रुपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे चोरी झाल्याची घटना बुधवारी (१३ फेब्रुवारी) रात्री उघडकीस आली. घरातील नोकरानेच ही चोरी केल्याचे लक्षात आल्यानंतर, तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताला परभणी पोलिसांनी अटक केली.

कपाटात ठेवलेली सोन्याची पाच बिस्कीटे आणि १० हजारांची रोकड नोकराने महिनाभरापूर्वीच लंपास केली. हा प्रकार मंगळवारी रात्री डॉ. पाटील यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलिसांत धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पाटील यांच्या बंगल्यात अनेक वर्षांपासून बंडू म्हसे हे नोकरी करत होते. तसेच, त्यांचा मुलगा आकाश म्हसे हादेखील कामासाठी येत असे. कपाटात ठेवलेली बिस्कीटे व १० हजारांची रोकड घेऊन तो १३ जानेवारी रोजी काढून घेत फरार झाला. त्या दिवसापासून आकाश कामावर आला नाही. तो परभणी येथील सेलू येथील मूळ गावी गेल्याचे सांगण्यात आले. चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर डॉ. पाटील यांनी पोलिसांना घडनेची माहिती दिली. पोलिसांनी आकाश म्हसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

चोरीची बिस्कीटे विक्री करताना अटक

सरकारवाडा पोलिसांनी परभणी पोलिसांशी संपर्क साधला असता, आकाशला बिस्कीट विक्री करताना सेलू गावातून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचेही म्हटले आहे.