घरमहाराष्ट्रनाशिकपंधरवड्यात सातवा खून; पोलिसांपुढे आव्हान

पंधरवड्यात सातवा खून; पोलिसांपुढे आव्हान

Subscribe

शहरातील गुन्हेगारीचा आलेख चढाच; आरोपी पकडण्यापलिकडे कारवाईची व्यक्त होतेय गरज

नाशिक : शहरातील गुन्हेगारीचा आलेख काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसून, गेल्या पंधरा दिवसांत सातवा खून शहरात झाल्याने पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चिला जात आहे. पोलीस आयुक्त व सहकार्‍यांकडून अशा घटनांतील आरोपींना ताब्यात घेण्यापलिकडे ठोस कारवाई व्हावी, त्याप्रमाणे गस्त वाढवून प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी, अशी मागणी आता नाशिककरांकडून होऊ लागली आहे.
आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी नाशिकची सुत्रं हाती घेतल्यापासूनचा गुन्हेगारी आलेख पाहिल्यास त्यात सातत्याने वाढ होत गेल्याचेच दिसून येते. खूनासह जबरी लूट, हाणामार्‍या, चेन स्नॅचिंग, अपहरण व चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांचाच विचार केल्यास नाशिक शहरात तब्बल सात खून झाले. यातील एक-दोन घटना वगळल्यास अन्य घटना वर्चस्ववादातून, एकमेकांतील वादातून झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेचा वचकच राहिला नसल्याचे बोलले जात आहे.
शहरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह रात्री उशिरापर्यंत वावरणार्‍या टवाळखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता नाशिककरांकडून केली जात आहे. शिवाय शहरात प्रतिबंधात्मक कारवाई वाढवून सातत्याने नाकाबंदी, लेट नाईट विक्रेत्यांवर कारवाई, वाहन तपासणी, मद्यपींसह टवाळखोरांवर कारवाई केली गेल्यास तसेच रात्रीची गस्त अधिक वाढवल्यास काही अंशी गुन्हेगारीवर अंकुश मिळेल, असेही मत यानिमित्ताने सृजाण नाशिककरांकडून व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, कुठल्याही गुन्ह्यांतील गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याबरोबरच या गुन्हेगारांच्या मतपरिवर्तनासाठी गुन्हेगार सुधार योजना, नागरिकांशी सातत्याने संवाद, स्पॉट व्हिजिट, समुपदेशन अशा गोष्टींवरही भर देणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने पोलीस यंत्रणेने पावले उचलल्यास नाशिकमधील गुन्हेगारीला आळा बसू शकेल.

खुनांची मालिका थांबणार कधी..?
नाशिक शहरात खूनाचे सत्र सुरु आहे. चोरी, लुटमार, फसवणुकीच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरुन थेट जीवघेणा हल्ला केला जात असल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. शहरात १५ दिवसांत तब्बल ७ खून झाले आहेत. या खुनांच्या घटनांमुळे नाशिक हादरले आहे. १६ मे रोजी रात्री ११.३० वाजता स्वयंपाक येत नसल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीचा खून केल्याची घटना आडगावमध्ये घडली होती. तर, १८ मे रोजी पंचवटीत शिवीगाळ व हट्टी स्वभावाला कंटाळून बापाने मुलाचा खून केला. १८ मे रोजी रात्री ९ वाजेदरम्यान म्हसरूळमध्ये भांडण सोडवणार्‍या तरुणाचा टोळक्याने खून केला. १९ मे रोजी मैत्री कमी केल्याच्या कारणातून वकील व पोलीसपुत्रांनी तरुणाचा खून केला. २० मे रोजी पहाटे ४.३० वाजता कट मारल्याने नशेखोर टोळक्याने प्रवाशाचा खून केला. २८ मे रोजी रात्री भांडणात मध्यस्थी झाल्याने तिघांनी तरुणाचा खून केला. यानंतर काहीच दिवसांत शिवाजीवाडीत प्रेम प्रकरणात मध्यस्थी करणार्‍या तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना होऊन दोन दिवस उलटत नाही, तोच आता दोन मित्रांच्या वादात बुधवारी सकाळी एकाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून झाल्याची घटना घडल्याने खुनांची ही मालिका आता थांबणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

वर्चस्ववाद बळावतोय; निवडणुकीच्या तोंडावर पोलीस यंत्रणेपुढे आव्हान!
एकीकडे निवडणुकीचा माहोल असताना आता खर्‍या अर्थाने पोलिसांना आपली ‘खाकीची पॉवर’ दाखवण्याची वेळ आली आहे. मात्र, प्रत्यक्षात पुन्हा नाशकात टोळ्या सक्रिय होऊ लागल्याचे दिसतेय. म्हसरूळला घडलेल्या खुनाच्या घटनेलाही निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे बोलले गेले. वाढत्या वर्चस्व वादातून आता टोळ्या भडकू लागल्या आहेत. अशा स्थितीत पोलीस आयुक्तांसह सहकार्‍यांना अ‍ॅक्शन मोडवर येणे गरजेचे आहे. अन्यथा शहरात गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढायला वेळ लागणार नाही, अशी भीतीही नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे.

रात्रीची गस्त नावालाच
नाशकात द्वारका, बिटको पॉइंट, नाशिकरोड, चोपडा लॉन्स, सीबीएस, मुंबई नाका, पाथर्डी फाटा, सातपूर, आनंदवली, पेठ फाटा, पंचवटी, आडगाव, नांदूर नाका, उपनगर ही अशी काही ठिकाणे रात्रीच नव्हे, तर दिवसाही वाटसरू, प्रवाशांना धोक्याची बनली आहेत. अशा ठिकाणी रात्रीच्या वेळेस नावापुरतीच पोलीस गस्त वा बारकोड स्कॅनिंग होत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सायंकाळनंतर महिला वा युवतीच नव्हे, तर पुरुषही सुरक्षित नसल्याचे आजवरच्या घटनांवरून दिसून येते. रात्रीच्या वेळेत गुन्हेगारी पार्श्वभूमी अन् विनानोंदणी रिक्षाचालकांचा वाढता वावर धोकादायक ठरतोय. रात्री उशिरा मद्यपी टोळक्यांचा वावरही धोकादायक ठरतोय.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -