घरमहाराष्ट्रनाशिकढोल-ताशांच्या महावादनाने नाशिकचा आसमंत दुमदुमला

ढोल-ताशांच्या महावादनाने नाशिकचा आसमंत दुमदुमला

Subscribe

नववर्ष स्वागत समिती आयोजित महावादनात शेकडो वादकांचा सहभाग

नाशिक : राष्ट्रीय विकास मंडळ, संचलित नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात शनिवारी (दि.१६) भव्य दिव्य महावादन झाले. तरुणवर्गाचे आकर्षण असलेला ढोल-ताशा वादनाचा महोत्सव यावर्षी हनुमान जयंतीचे औचित्य साधून आल्याने यंदाचे महावादन भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वनवासी वीर आणि स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित करण्यात आले.

समितीतर्फे शनिवारी सायंकाळी ६ वाजता पाडवा पटांगण (जुने भाजी पटांगण), नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी येथे हा महावादन सोहळा पार पडला. यात तब्बल एक हजार युवाशक्तींनी सामूहिक ढोल-ताशा वादन सादर केले. ज्येष्ठ ताशावादक राजन घाणेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

- Advertisement -

आमदार अॅड. राहुल ढिकले, डी. जे. हंसवानी, तसेच नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे हे मंचावर उपस्थित होते. २०१६ पासून नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे दरवर्षी महावादनाचा कार्यक्रम घेतला जातो. यावर्षी या महावादनाचं हे ६ वे वर्ष असून आजमितीस तब्बल जिल्ह्यातील ४२ ढोल पथकांशी संपर्क साधून त्यांना सहभागी करून घेण्यात आले.

या महावादनामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांमध्ये प्रेम, बंधुभाव आणि एकोप्याची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने यावर्षी सर्वांचा एकत्रित मिळून एकच सुवर्ण कलश मंडित भगवा ध्वज नाचवण्यात आला. महावादनात १००० ढोल, २५० ताशे आणि १५०० वादक आणि झांज वादकांच्या सहभागातून लय-ताल आणि नाद यांची एकतानता साधली गेली. या आयोजनात १५० स्वयंसेवकांनी काम केले. यावर्षी श्रीराम नगरी ढोल ताशा पथकाचे प्रमुख आशिष सोनावणे हे या महावादनाचे प्रमुख होते.

- Advertisement -

ध्वजप्रणाम करत भारत माता की जय या घोषणेने महावादन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पहिला हात मग पाचवा हात यांचे वादन करण्यात आले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांची गारद देण्यात आली. त्यानंतर पहिल्यांदाच इतक्या सर्व पथकांची मिळून शिवस्तुती बसवण्यात आली. त्याचेही वादन व सादरीकरण करण्यात आले. ढोल सादर झाले. दीड तास चाललेल्या या महावादनाने गोदातीर दुमदुमून गेला. कार्यक्रमाद्वारे मोठ्या संख्येने नाशिककरांनी ब्रह्मनादाचा अनुभव घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -