घरमहाराष्ट्रनाशिकबाप रे बाप, अ‍ॅक्टिवात साप!

बाप रे बाप, अ‍ॅक्टिवात साप!

Subscribe

पंचवटी बाजार समितीसमोर घडला प्रकार

 साप म्हटले की भल्याभल्यांची बोबडी वळते. नुसते नाव जरी घेतले तरी सर्वत्र एकच धावपळ होते. त्यात पावसाळा आला की जागोजागी हे सर्पमहाशय बाहेर निघतात. असाच एक प्रकार पंचवटी बाजार समितीसमोर घडला. एक सर्पराज दुचाकीच्या इंजिनमध्ये शिरले. परिसरातील नागरिकांनी याबाबत तातडीने सर्पमित्रांना कळवले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनतर सर्पाची सुटका करण्यात आली.

पंचवटीतील बाजार समितीसमोरील पार्किंगमध्ये ही घटना घडली. येथे एक अ‍ॅक्टिवा गाडी उभी होती. या गाडीच्या खाली सायलंसरमधून काही तरी हालचाल सुरू असल्याचे येथे उभ्या असलेल्या नागरिकांच्या लक्षात आले. नीट बघितले असता तो साप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अचानक साप आढळल्याने नागरिकांनी आराडाओरडा केला. बघता बघता दुचाकी भोवती नागरिकांनी गर्दी केली. यावेळी सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच सर्पमित्र अनिकेत केळकर, विशाल बाफणा, स्वप्निल सानप, तन्मय धाडीवाल घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सापाला अलगद बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र जसतसं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला जात होता तसतसा तो आणखी आतमध्ये जात होता. गर्दीमुळे मदतकार्यात अडथळा येत असल्याने दुचाकी अलगदपणे पंचवटी पोलीस ठाण्यात आणण्यात आली. गाडीची डिक्की खोलून साप काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा सर्प गाडीच्या इंजिनखालून सतत मागेपुढे होत असल्याने अखेर गाडी आडवी करून पॅनल खोलण्यात आले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनतर सर्प पकडण्यात सर्पमित्रांना यश आले. तस्कर जातीचा सुमारे तीन ते साडेतीन फुटाचा हा सर्प बिनविषारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वनविभागाकडे नोंद करण्यात येऊन सर्पाला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडून देण्यात आला.

- Advertisement -

पावसापासून बचाव करण्यासाठी सापासारखे प्राणी जागेच्या शोधात मानवी वस्तीत आसरा शोधतात. गाड्यांचे पार्किंगस्थळ हे तर आता अशा प्राण्यांसाठी नेहमीचेच झाले आहे. पावसाळ्यात बिळे व जमिनीखालील जागा बुजल्या गेल्याने साप मानवी वस्तीकडे आकर्षित होतात. पावसाळ्याच्या काही दिवस अगोदर मानवी वस्तीतील सुरक्षित ठिकाणे, त्यात दगड-विटांचे ढिगारे, घरांच्या कपारीचा असरा घेतात.त्यामुळे घराबाहेर पडताना वाहन व इतर गोष्टी तपासून घेणे गरजेचे असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -