शाळेतील विद्यार्थी घेणार गोदासंवर्धनाची शपथ

नाशिक : गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागासह आता महापालिकेचा शिक्षण विभागही सरसावला आहे. आता महापालिकेचा शिक्षण विभागही पुढे सरसावला आहे. शाळेत प्रार्थनेच्या वेळी गोदावरी नदीच्या स्वच्छतेबाबत विद्यार्थी आणि शिक्षक शपथ घेणार आहेत. गोदा संवर्धनासाठी प्रार्थना म्हटली जाणार आहे. लवकरच हे गीत स्वरबद्ध केले जाणार आहे. त्याशिवाय शालेय स्तरावर पुढच्या वर्षी 25 मे 2023 पर्यंत प्रत्येक महिन्याला होणा-या कार्यक्रमाची रुपरेषा ठरली आहे. तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारे गोदावरी आज दुथडी भरून वाहते आहे. सध्या जिल्हाभरात पाऊस सुरु असल्याने गोदावरीला पूर आला आहे. मात्र उन्हाळ्यात गोदावरीची या उलट परिस्थिती असते. म्हणजेच गोदावरी अनेक ठिकाणी प्रदूषित असल्याचे दिसून येते. यासाठी स्थानिक पातळी ते केंद्र स्तरापर्यंत गोदावरी संवर्धनासाठी झटत आहेत. आता यात नाशिक मनपा शिक्षण विभाग देखील पुढे सरसावला आहे. नदी स्वच्छतेसाठी शाळांमधून प्रार्थना म्हटली जाणार आहे. त्याशिवाय शालेय स्तरावर पुढच्या वर्षी 25 मे 2023 पर्यंत प्रत्येक महिन्याला होणा-या कार्यक्रमाची रुपरेषा ठरली आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार आहे. जुलै महिन्यात रांगोळी स्पर्धा, ऑगस्टमध्ये निर्माल्य आणि इतर कचरा नदीत टाकू नये याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

असे आहेत कार्यक्रम

सप्टेंबरमध्ये निर्माल्यापासून खत निर्मिती, ऑक्टोबरमध्ये प्लास्टीक कचरा रस्त्यावर किंवा नदीत टाकू नये याबाबत जनजागृती, नोव्हेंबर महिन्यात नदीच्या स्वच्छतेबाबत उपक्रम सुचवा स्पर्धा घेण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये ‘मी गोदावरी नदी बोलते’ या विषयावर एकपात्री नाटक नाट्य स्पर्धेत घेतले जाणार आहे. तसेच जानेवारी 2023 मध्ये ‘गोदावरी स्वच्छता’ यावर गीतरचना स्पर्धा घेतली जाणार आहे. फेब्रुवारीमध्ये नदीच्या स्वच्छतेबाबत ‘मी नाशिक’ या नात्याने या विषयावर वकृत्व स्पर्धा होणार आहे. मार्चमध्ये ‘गोदावरी नदी वाचवा’ यावर शासकीय कर्मचा-यांमध्ये जनजागृतीची शपथ घेतली जाणार आहे.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी प्रदूषण नियंत्रणाबाबत समितीच्या त्रैमासिक बैठकीतील सुचनांची काटेकोर अंमलबजावणी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून केली जात आहे. याबाबत सर्व केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आली आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून गोदावरी नदीचं प्रदूषण दूर होण्यास मदत होईल. : सुनिता धनगर, प्रशासनाधिकारी, महापालिका