कार्यकारी अभियंत्यांची टेबल-खुर्ची झाली जप्त

३९ वर्षे उलटूनही संपादीत जमिनीचा मोबदला नाही

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील लहामगेवाडी येथील शेतकर्‍यांचा जमीन संपादनाचा मोबदला ३९ वर्ष उलटूनही न दिल्याप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची आणि कार्यालयातील फर्निचर जप्त करण्यात आले.
१९८८ मध्ये इगतपुरी तालुक्यातील लहामगेवाडी येथील शेतकरी भिवा जाधव यांची शेतजमीन पाझर तलावासाठी संपादीत करण्यात आली होती. मात्र, भूसंपादनासाठी मोबदला न मिळाल्याने जाधव यांनी २५ जानेवारी २००८ रोजी कोर्टात दावा दाखल केला होता. २९ एप्रिल २०१४ साली भिवा जाधव यांच्या बाजूने कोर्टाने निकाल देताना मोबदला तात्काळ देण्याचे पाटबंधारे विभागाला आदेशित केले. ६ वर्षे ३ महिने ४ दिवस ही केस चालली. कोर्टाने निकाल देवूनही ७ ते ८ वर्षे उलटली परंतू, अधिकार्‍यांकडून कोणतीही दाद दिली जात नव्हती.

केवळ आश्वासनांवरच बोळवण केली जात होती. मागणीची कोणतीही दखल घेतली जात नव्हती. भीवा जाधव यांचे वय ९३ वर्षे आहे तर त्यांचा मुलगा भिमा जाधव वयाच्या ७० कडे झुकला आहे. ३९ वर्षे उलटूनही जागेचा मोबदला मिळत नसल्याने जाधव यांनी अखेर याविरोधात पुन्हा कोर्टात याचिका दाखल केली. त्यानुसार कोर्टाने जप्तीचे आदेश दिले. गुरूवारी याचिकाकर्ते आपल्या वकिलासह उंटवाडी रोडवरील सिंचन भवन कार्यालयातील नाशिक कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात पोहोचले. यावेळी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

बर्‍याचा वादानंतर दोन्ही बाजूंकडील वकीलांचा युक्तीवाद रंगला. अखेर जाधव यांच्या बाजूने निकाल देत नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्या दालनातील सर्व फर्निचर, अधिकार्‍यांची खुर्ची, टेबलसह जप्त
करण्यात आले.

पाझर तलावासाठी १९८८ साली आमची जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीच्या सुमारे दीड कोटी रूपयांच्या मोबदल्यासाठी आम्ही ६ वर्षे ३ महिने न्यायालयीन लढा दिला. कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागूनही ७ ते ८ वर्षांपासून मोबदला मिळालेला नाही. अधिकार्‍यांकडून मोबदला देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. अखेर याविरोधात याचिका दाखल केली असता कोर्टाने जप्तीचे आदेश दिले. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली. : भीमा जाधव, याचिकाकर्ते