उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज अनावरण

कळवण : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण आज (दि.१०) दुपारी ४ वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असल्याची माहिती कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी दिली.

कळवण शहरातील शिवतीर्थ येथे कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून लोकसहभागातून छ्त्रपती शिवाजी महाराजांचा उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच अश्वारुढ पुतळा दिल्ली येथील सुप्रसिध्द शिल्पकार पद्मभूषण राम सूतार यांनी साकारला आहे. आज या पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते तर युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. कार्यक्रमास पद्मभूषण राम सूतार, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ह.भ.प. संजय धोंडगे, प्रा. यशवंत गोसावी आदींसह मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमास तालुक्यातील आणि परिसरातील शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार नितीन पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी केले.

विविध कार्यक्रम

अनावरण सोहळ्यानिमित्त दुपारी २.०० वाजता शिवशाहीर कार्यक्रम (पोवाडा),दुपारी ४ वाजता पुतळा अनावरण तर सायंकाळी ६ वाजता लेझर लाईट आणि फायर शोचे आयोजन करण्यात आले आहे.

पुतळ्याची वैशिष्ट्ये
  • उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा
  • पुतळ्याची उंची २१ फूट
  • पुतळ्याची लांबी १७ फूट
  • पुतळ्याचे वजन ७ टन