घरमहाराष्ट्रनाशिकप्लास्टिक विघटन यंत्र खरेदीचे 'ते' वादग्रस्त टेंडर अखेर 'झेडपी' सीईओनी केले रद्द;...

प्लास्टिक विघटन यंत्र खरेदीचे ‘ते’ वादग्रस्त टेंडर अखेर ‘झेडपी’ सीईओनी केले रद्द; दीड महिन्यानंतर उपरती

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने मागील दीड महिन्यांपासून २.४० कोटींच्या वादग्रस्त प्लास्टिक विघटन यंत्र खरेदीचे टेंडर मार्गी लावण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी अखेर ते टेंडर रद्द करून नवीन टेंडर राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे गेले तीन महिन्यांपासून रखडलेली खरेदी फेरटेंडरमधून मार्गी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. दरम्यान फेरटेंडर करताना प्लॅस्टिक विघटन यंत्रांची आधीच्या टेंडरपेक्षा वेगळे स्पेसिफिकेशन करण्याची तसेच या विभागाने शासन निर्णयांचे काटेकोर पालन केले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाला स्वच्छ भारत मिशन टप्पा दोनमधून २.४० कोटी रुपये निधी दिला आहे. प्रत्येक पंचायत समितीसाठी १६ लाख रुपये निधीतून प्रत्येकी एक प्लास्टिक विघटन केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने जीइएम पोर्टलवर टेंडर प्रक्रिया राबवली. हे टेंडर राबवताना १ डिसेंबर २०१६च्या शासन निर्णयाचे पालन केले नाही. खरेदी समिती बैठक, बाजारभावाप्रमाणे या यंत्रांची किंमत, इतर संस्थांनी खरेदी केलेल्या यंत्रांचे दर याबाबत कोणत्याही बाबीचे पालन न करता एक पुरवठादार पात्र ठरवून ते टेंडर मंजुरीसाठी प्रस्तावित केले. लेखा व वित्त विभागाने या टेंडरची तपासणी करताना वरील बाबी नमूद केल्यानंतरही उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ही खरेदी वेळेत करायची असल्याचे कारण सांगत त्रुटींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

दरम्यानच्या काळात स्वच्छता व पाणी पुरवठा विभागातील लेखा अधिकारी निवृत्त झाल्यानंतर नव्याने प्रभार दिलेल्या लेखा अधिकार्‍यांनी या टेंडरची पूर्ण तपासणी करून त्यातील चुका लक्षात घेता फेरटेंडर राबवण्याचा अभिप्राय दिला.

दीड महिन्यांनी अ‍ॅक्शन

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे टेंडर रद्द करण्याबाबत असहमती व्यक्त करताना त्यात कालापव्यय होईल आपल्याला लवकरात लवकर प्लॅस्टिक विघटन यंत्र खरेदी करायची असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर महिना उलटूनही कोणताही विभाग या खरेदीबाबत समाधानी नसल्याचे लक्षात येताच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याच विनंती केली. मात्र, या टेंडरच्या फायलीतील एकूण अनियमितता बघता, त्यांनी काहीही निर्णय दिला नाही.

- Advertisement -

त्यानंतरही डॉ. वर्षा फडोळ यांनी इतर जिल्हा परिषदांनी खरेदी केलेल्या यंत्राचे दर सादर करून नाशिक जिल्हा परिषदेचे दर कसे योग्य आहेत, याची मांडणी करून त्या दरांना मान्यता देण्याचा प्रस्ताव पुन्हा सादर केला. दरम्यानच्या काळात या टेंडरसाठी असलेली ९० दिवसांची मुदत ७ मे २०२३ रोजी संपली. यामुळे लेखा व वित्त विभाागाने टेंडर वैधता मुदत संपल्याच्या कारणााने फेरटेंडर करण्याची शिफारस केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी प्लॅस्टिक विघटन यंत्र खरेदीचे टेंडर रद्द करून ते फेरटेंडर राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेतही या निर्णयावर सोमवारी (दि.१५) शिक्कामोर्तब करण्यात आले.

या टेंडरमध्ये नियमांचे पालन केले नसल्याने ते रद्द करून फेरटेंडर राबवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना वरिष्ठ अधिकार्‍यांनी सल्ला देऊनही त्यास असहमती दर्शवणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दीड महिन्यांनी तोच निर्णय घेतला आहे. यामुळे हा दीड महिना कालावधी कोणामुळे वाया गेला, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -