सप्तशृंगी देवीचे मंदिर दीड महिना बंद

नाशिक : साडेतीन शक्तिपिठापैकी एक असलेल सप्तशृंगी देवी मंदिर दीड महिना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलाय. २२ जुलै ते ५ सप्टेंबर  दरम्यान सप्तशृंगी देवी  मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

देवीच्या मूर्तीचे संवर्धन आणि कामकाजाच्या अनुषंगाने सप्तशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार २२ जुलैपासून ०५ सप्टेंबरपर्यंत भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वणी येथील गडावरील सप्तशृंगी मातेचे मंदिर बंद राहणार आहे. दरम्यानच्या काळात भाविकांना पहिल्या पायरीच दर्शन घेता येणार आहे. देवीच्या मूर्तीचे संवर्धन आणि कामकाजाच्या अनुषंगाने सप्तशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा सुचना देखील शासनाच्या पुरातत्व विभागाकडून देण्यात आल्या आहेत. विश्वस्त संस्थेच्या वतीने पहिल्या पायरीवर उपकार्यालयाच्या नजीक श्री भगवतीची हुबेहुब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून ठेवली जाणार आहे. यासोबतच तसेच भाविकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसाद, भक्तनिवास व इतर सुविधा या सातत्यपूर्वक कार्यरत असेल असेही मंदिर संस्थानच्या वतीने कळविण्यात आलं आहे.

याआधीही कोरोनामुळे भाविकांना सप्तशृंगीदेवीच्या दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. मात्र कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले करत आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.