प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांना पुन्हा खो ?

नाशिक : राज्य सरकारने यापूर्वी 30 जूनपर्यंत शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्यांना स्थगिती दिलेली असताना आता 31 ऑगस्टपर्यंत बदल्यांना स्थगिती दिल्याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे. राज्यात अद्याप मंत्रीमंडळ जाहीर न झाल्यामुळे प्रशासकीय पातळीवर संभ्रमावस्था आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाला आता 31 ऑगस्टपर्यंत बदल्या होणार नसल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी यांच्या नियमित बदल्या मे व जूनमध्ये होत असतात. मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे बदल्यांबाबत सरकारने हात आखडता घेतला होता. यामुळे यावर्षी फेब्रुवारीपासूनच बदल्यांची तयारी करण्यात आली होती. नाशिक जिल्हा परिषदेने सेवाज्येष्ठता यादी तयार केली. मात्र, रिक्त पदे मोठ्यासंख्येने असल्यामुळे बदल्यांची प्रक्रिया राबवल्यास पेसा क्षेत्रातील शंभर टक्के पदे भरावी लागतील. परिणामी सर्वसाधारण क्षेत्रातील आधीच रिक्त असलेल्या पदांमध्ये वाढ होईल, यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने पेसा क्षेत्रातील बदल्यांच्या नियमामध्ये सूट देण्यासाठी सरकारकडे पत्रव्यवहार केला. त्याला काही उत्तर आले नाही. पण दरम्यानच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नियमित बदल्यांना 30 जूनपर्यंत स्थगिती दिली.दरम्यानच्या काळात राज्यात स्थलांतर होऊन अद्याप मंत्रीमंडळ जाहीर झालेले नाही. यामुळे प्रशासनात संभ्रमाचे वातावरण असून बदल्या होणार किंवा नाही, याबाबत मंत्रालयाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता किमान 31 ऑगस्टपर्यंत बदल्या होणार नसल्याचे मंत्रालयातून उत्तर मिळत आहे.