महापालिका आयुक्त रमेश पवार यांची बदली, आपलं महानगरच्या बातमीवर शिक्कामोर्तब

नाशिक : नाशिक महानगर पालिका आयुक्त रमेश पवार यांची अखेर बदली झाली आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे नाशिकच्या आयुक्त पदाचा कारभार संभाळतील. रस्ते विकास महामंडळ, सहव्यवस्थापक संचालक म्हणून कार्यरत असलेले पुलकुंडवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मातोश्रीच्या मर्जीतील असल्यानेच रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यावेळी बोललं गेलं होतं. याबाबत सर्वात आधी दैनिक ‘आपलं महानगर’ने आतली बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीवर आज शिक्कामोर्तब झालंय.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महानगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या बदलीला अधिक महत्व प्राप्त झालं आहे. पवार यांच्या आधी आयुक्त पदावर असलेले कैलास जाधव हेही एकनाथ शिंदे यांच्या शिफारसीनेच आयुक्त पदावर रुजू झाल्याचं बोललं जातं होत. मागील वर्षी दिवाळीच्या दरम्यानच त्यांची बदली करण्याच्या हालचाली महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी सुरू केल्या होत्या, मात्र त्यावेळीही एकनाथ शिंदे यांनीच त्यांची बदली रोखली होती. मात्र मार्च महिन्यात भूसंपादनाच्या मुद्द्यावरून त्यांची बदली करून बृहन्मुंबई महानगरपालिकेत रुजू असलेले आणि मातोश्रीचे निकटवर्तीय मानले गेलेले रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती.

राज्यात भूतो न भविष्यती घडामोडी घडून सत्तांतर झाले. भाजपच्या पाठींब्याने एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. लागलीच शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय, जिल्हा नियोजनला दिलेला निधी आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यांच्यावर ब्रेक आणण्यास सुरवात केली होती त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिका आयुक्तांच्या बदलीकडे बघितले जात आहे.

 

‘आपलं महानगर’ने प्रसिद्धी केली होती ‘आतली बातमी’