ट्रकमालकानेच गुंडांच्या मदतीने केली मद्यसाठ्याची लूट

गावठी कट्टा बाळगणे पडले महागात

दिंडोरी येथून पनवेलला पाठवला जाणारा विदेशी मद्यसाठा ट्रकमालकानेच गुंडांच्या मदतीने लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःच्याच ट्रकचालकाला गुंडांद्वारे मारहाण करत ट्रकमालकाने हा साठा लंपास केला होता. शहर पोलिसांनी बारकाईने तपास करत ट्रकमालकाच्या मुसक्या आवळत मालेगाव-मनमाड रोडवरील वर्‍हाणेपाडा शिवारात सव्वा कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जीवंत काडतुसे जप्त केली. साईनाथनगर, नाशिक येथील मंदार हरी कुलकर्णी (वय ३९) अटक करण्यात आलेल्या ट्रकमालकाचे नाव आहे.

१८ जानेवारी रोजी विल्होळी (ता.नाशिक) येथील ट्रकचालक जगदीश संपत बोरकर याने ताब्यातील ट्रक (एमएच ४५-बीएम-१६१०) दिंडोरी येथील परनोड रिकॉर्ड कंपनीतून १ लाख ३८ हजार ६१० रुपयांचे ब्लेंडर स्प्राईड व १०० पाइपर्स कंपनीचे विदेशी दारुने भरलेले १ हजार ८ बॉक्स दिंडोरी येथून पनवेल, नवी मुंबई येथे घेवून जात होता. ट्रकमालकाकडून पैसे घेण्यासाठी चालक जगदीश बोरकर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ रात्री १०.४५ वाजेदरम्यान थांबला. त्यावेळी अनोळखी तीनजणांनी ट्रकमध्ये चढून चालकास मारहाण व शिवीगाळ केली. तिघांनी चालकाच्या डोळ्यास पट्टी बांधून ट्रक मुंबई-आग्रा रोडने उमराणे येथे आणला. चालकास मारहाण करत ट्रकमधून उतरवून तिघे ट्रकसह फरार झाले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शुक्रवारी गावठी कट्टा बाळगणार्‍यास पोलिसांनी साईनाथनगर चौफुलीवर ताब्यात घेत चौकशी केली. तपासात तो ट्रकमालक असल्याचे आणि त्यानेच रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण साळुंके व त्याच्या साथीदारांच्या मदतीने मद्यसाठा पळवून नेल्याची कबुली दिली.

रेडीयमने बदलला ट्रक क्रमांक

शहर गुन्हे शोध पथकाने ट्रक लुटीचा तपास सुरु केला. रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण साळुंके याने ट्रक लुटमार केल्याची व तो मालेगाव, मनमाड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शोध पथकास ट्रक मालेगाव-मनमाडरोडवर असलेल्या साईसेवा सैनी ढाब्याजवळील मोकळ्या जागेत दिसला. पथकाने ट्रकची पाहणी केली असता ट्रकच्या पुढे व मागे रेडीयमने एमएच १५-एजी ६३६३ क्रमांक चिकटवलेला दिसला.

लपवलेला मद्यसाठा सापडला वर्‍हाणेपाड्यात

मालेगाव-मनमाड रोडवरील वर्‍हाणेपाडाकडे जाणार्‍या रोडवर एक कार रस्त्याच्या कडेला उभी दिसली. पथक त्यांच्याजवळ खासगी गाडीने जात असताना अंधारामध्ये कारजवळ उभे असलेले अनोळखी पाचजण कारमध्ये बसून पळू लागले. त्यामध्ये गुन्हेगार किरण साळुंके असल्याचे पोलिसांना दिसून आले. सर्वजण कारसह फरार झाले. कार वर्‍हाणेपाडा शिवारातील घराजवळ का उभी होती, याचा संशय आल्याने पोलिसांनी घरामध्ये तपासणी केली असता चोरी केलेल्या विदेशी दारुचे बॉक्स दिसून आले. पोलिसांनी ट्रक व दारुचे बॉक्स जप्त केले.