Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र सीएनपी प्रेसच्या भिंती सांगतील नोटांचा इतिहास अन् सांस्कृतिक वैभव!

सीएनपी प्रेसच्या भिंती सांगतील नोटांचा इतिहास अन् सांस्कृतिक वैभव!

Subscribe

किशोर शिंदे । नाशिक

नोटबंदीच्या चर्चेने एकीकडे रान पेटवले असताना दुसरीकडे जेलरोडच्या नोटा छापण्याच्या कारखान्याला ५०० रुपयांच्या २८० कोटींच्या नोटांची छपाई करण्याची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे या नोटप्रेसची भारतभर चर्चा सुरु झाली आहे. अशा वातावरणातच या नोट प्रेसच्या (सीएनपी) भिंती मात्र कलात्मक संदेश घेऊन बोलू पाहत आहेत. या कारखान्याने आजवर छापलेल्या विविध मूल्यांच्या ’नोटा’ व महाराष्ट्रीयन खासकरून ’नाशिककरांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये’ चित्ररुपाने या बोलक्या भिंती सांगणार आहेत.

- Advertisement -

१९६५ साली स्थापन झालेला हा नोटांचा कारखाना नाशिकची ठळक ओळख बनला असून, सेंट्रल जेल परिसरातील नोटांचा कारखाना, येथील असणारी कडेकोट सुरक्षा व्यवस्था या सर्व गोष्टी पर्यटकांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. जेलरोडलगत असणारी सीएनपी प्रेसची इमारत आणि या इमारतीच्या सभोवताली असणारी अत्यंत उंच अशी अंदाजे 20 ते 25 फूट उंचीची भिंत, त्यावरील काटेरी ग्रिल या सर्व गोष्टी आजवर जेलरोड, नाशिकरोडकरांसाठी सर्वसामान्यच होत्या. मात्र, आठवडाभरापूर्वी येथे अचानक भिंती रंगविण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता अनेक चित्र रंगवूनदेखील झाले. टेंडर पद्धतीने या चित्रकामाचा ठेका मध्यप्रदेश येथील ’सतरंगी क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीस देण्यात आला आहे. सध्या येथे इंदूरस्थित ‘ललित कला संस्थान’ या सरकारी कॉलेजचे कलाकार विद्यार्थी भिंतीवर रंगकाम करत आहेत.

या विद्यार्थ्यांमध्ये अश्विन बडोदिया, विकास बांगर, साहिल वर्मा, राजेश परमार व हर्षवर्धन भिलाल हे कलाकार दुपारी दोन ते सायंकाळी अंधार पडेपर्यंत भिंतीवर चित्र काढून त्यात रंग भरतात. सीएनपी प्रेसच्या मुख्यप्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर अंदाजे 25 ते 30 चित्र काढण्यात येणार असून, यात आजवर भारतात छापण्यात आलेल्या चलनी नोटा ज्यात एक, दोन, पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे, दोन हजार व दहा हजार रुपये किंमतीच्या नोटांची चित्रे काढली जाणार आहेत. त्याचबरोबर नाशिकचे सांस्कृतिक वैशिष्ट्य असणारे ढोल, बैलगाडी, तुतारी, कांदा उत्पादक शेतकरी, मल्लखांब, कुस्ती, पांडवलेणी इ. चित्र रंगवण्यात येतील.

- Advertisement -

येता-जाताना लोक येथे थांबून फोटो काढताना दिसून येतात. कोणती चित्रे काढावीत याबाबतचा निर्णय प्रेसच्या वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांकडून घेतला जातो. महत्त्वाचे म्हणजे या भिंतीवर महापुरुष व धर्माशी संबंधित कोणतीही चित्र काढली जाणार नसून रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी ऊघड्यावर ही चित्र असल्याने केवळ सांस्कृतिक महत्त्वाची व नोटांची चित्रे काढली जाणार असल्याचे समजते. या कामाबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. प्रेससमोरील बाजूस असणार्‍या जागेत नोटा व स्टॅम्पचे ‘म्युझियम’ लवकरच उभारण्यात येणार आहे.

आमच्या कंपनीने याआधी जळगाव व भुसावळ येथील रेल्वेस्टेशन परिसरात आर्टवर्कचे काम केले आहे. गुजरात येथे उभारल्या जात असलेल्या अत्याधुनिक ’दावोस’ शहरातील आर्टवर्कचे कामही कंपनीकडून केले जात आहे. नोटांच्या कारखान्याच्या भिंतींना वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीत रंगविले जाणार असून, 15 जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. : नीलेश नागर

- Advertisment -