नायलॉन मांजाने कापली युवकाची मान

मांजामुळे ४६ वर्षीय दुचाकीचालक महिलेचा बळी गेल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा इंदिरानगरमध्ये मांजामुळे दुचाकीचालक युवकाचा मान कापली गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. मांजा नाशिक शहरातून हद्दपार करण्यासाठी पोलिसांकडून विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जात असतानाही वापरकर्त्यांपर्यंत मांजा सहजपणे उपलब्ध होत असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मयुर कुलकर्णी असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

इंदिरानगर परिसरातून मयुर कुलकर्णी दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी त्याच्या मानेला नायलॉन मांजाचा विळखा बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या गळ्याला सात टाके घालण्यात आले आहेत. नायलॉन मांजाविरोधात पोलिसांकडून छापासत्र सुरु आहे. मांजा पुरवठा, विक्रेर्त्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी लाखो रुपयांचे रीळ जप्त केले असून तीन विक्रेत्यांना अटक केली आहे.