राज्य सरकारचे युवा धोरणच अधांतरी

युवा दिनाला दिल्या जाणार्‍या पुरस्कारांची गेल्या पाच वर्षात घोषणाच नाही

नाशिक : युवकांच्या कार्याला व त्यांच्यासाठी काम करणार्‍या संस्थेला प्रेरणा मिळावी म्हणून दरवर्षी युवा दिनाला दिल्या जाणार्‍या पुरस्कारांची गेल्या पाच वर्षात घोषणाच झालेली नाही. त्यामुळे राज्याचे युवा धोरणच अधांतरी असल्याचे दिसून येते.जगात सर्वाधिक युवकांचा देश म्हणून भारताची घोषणा झाल्यानंतर तत्कालिन राज्य सरकारने 2012 मध्ये युवा धोरण जाहीर केले.

त्यानुसार युवकांसाठी काम करणार्‍या व्यक्तिस जिल्हा व राज्य स्तरावर पुरस्कार देवून गौरवले जाते. या युवकांसोबत एका संस्थेलाही गौरविण्याची तरतूद शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केली आहे. राज्य स्तरावरील पुरस्कारार्थीला गौरवपत्र, सन्मानचिन्ह व 50 हजार रुपये देवून गौरविले जाते. तसेच, संस्थेला गौरवपत्र, सन्मानचिन्ह व एक लाख रोख दिले जातात. या धोरणाची अंमलबजावणी 2014-15 व 2015-16 या वर्षात दिले गेले. त्यानंतर व्यक्ती व संस्थांचा राज्य सरकारलाच विसर पडल्याने गेल्या पाच वर्षांपासून युवा धोरणाचीच परवड होत असल्याचे दिसून येते.

युवा धोरणाचा परिणाम
युवा धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. युवा दिनानिमित्त पंधरवडा साजार होत असला तरी व्यसनाधिन व सोशल मीडिया, मोबाईल गेम्स आणि ऑनलाईन सट्ट्याच्या आहारी युवक गेलेल्या युवकांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी या नैराश्येतून अनेक युवकांनी आत्महत्याही केल्याचे दिसून येते. युवा योग्य मार्गदर्शनासाठी राज्य सरकारने युवा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

शैक्षणिक पात्रता असूनही असंख्य युवक सद्यस्थितीला बेरोजगार आहेत. बेरोजगार युवक व्यसनाधिनतेकडे ओढले जात आहेत. सोशल मीडिया, मोबाईल गेम्स् आणि सट्ट्याच्या आहारी गेलेल्या युवकांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. यावर नियंत्रण मिळवून युवकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी युवा धोरणाची प्रभावी अमंलबजावणी व्हायला हवी.
– दर्शन पाटील, प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस