घरक्राइमबनावट चावीने १६ दुचाकींची चोरी

बनावट चावीने १६ दुचाकींची चोरी

Subscribe

सराईत दुचाकी चोरट्याला पोलिसांनी वेषांतर करून केले अटक

नाशिक : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरु असतानाच नाशिक शहर पोलिसांना सराईत दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वेषांतर करत सापळा रचून सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली. पोलीस तपासात त्याने एका बनावट चावीने नाशिक शहरातील १६ दुचाकी चोरल्याचे समोर आले. हेमंत रमेश सोनवणे (वय ३५, रा.फोपीर पावडदेव फाटा, ता. सटाणा, जि. नाशिक) असे अटक केलेल्या सराईत दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित पुंडलिक पेंढारी यांनी ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता दुचाकी (एमएच १५-डीक्यू ४१३०) वावरे लेन, मेन रोड परिसरात पार्क केली होती. त्यानंतर नोकरीच्या ठिकाणी गेले. ते रात्री ९ वाजता पार्किंग ठिकाणी आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांना कोठेही दुचाकी दिसून आली नाही. याप्रकरणी पेंढारी यांनी सोमवारी (दि.१९) भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपास सुरु केला.

- Advertisement -

ज्या ठिकाणी वारंवार दुचाकी चोरीला जातात, अशी ठिकाणी पोलिसांनी शोधून काढत या ठिकाणी पोलिसांनी वेषांतर करून सापळा रचला. त्यावेळी पोलिसांना एक संशयित युवक दिसला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १६ दुचाकी जप्त केल्या. पोलिसांनी भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे, मुंबई नाका पोलीस ठाण्यात एक, सटाणा पोलीस ठाण्यातील एक असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक किशोर खांडवी, ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस नाईक लक्ष्मण ठेपणे, रमेश कोळी, संदीप शेळके, कयुमअली सैयद, विशाल काठे, सागर निकुंभ, धनंजय हासे, संजय पोटिंदे, नितीन भामरे यांनी केली.

दुचाकी चोरटा निघाला सलून कामगार

दुचाकीचोरटा संशयित हेमंत हा सटाणा तालुक्यातील आहे. तो एका सलूनमध्ये काम करायचा. इतर वेळी तो नाशिक शहरात येऊन बनावट चावीने दुचाकी चोरी करायचा. त्यानंतर तो दुचाकी नाशिक जिल्ह्यात करायचा. विनाकागदपत्रे आणि स्वस्तात दुचाकी असल्याने अनेकांनी त्याच्याकडून दुचाकी खरेदी केली. या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून, कोर्टाच्या आदेशाने वाहनमालकांना दुचाकी दिल्या जात आहेत.

चोरीच्या दुचाकी खरेदी करणार्‍यांवर होणार कारवाई
नाशिक शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरु असताना भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून सराईत दुचाकी चोरट्यास अटक केली आहे. त्याने बनावट चावीने वाहनमालकाच्या गैरहजेरीत दुचाकी चोरी करून नाशिक जिल्ह्यात विकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. चोरीच्या दुचाकी खरेदी करणार्‍यांवरही कारवाई केली जाईल.
– किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -