… तर नाशिक पुन्हा लॉकडाउन

जिल्हाधिकार्‍यांचा इशारा : पोलीस, महापालिका आयुक्तांशी करणार चर्चा

पुनश्च एकदा हरिओम करत लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात काहीअंशी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे तब्बल अडीच महीन्यानंतर शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने उघडण्यात आली आहेत. मात्र दुकाने उघडताच बाजारपेठांमध्ये नागरीकांची तोबा गर्दी दिसून येत असल्याने सोशल डिस्टिंसिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. या गर्दीमुळे करोनाचा धोका अधिकच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत येत्या दोन दिवसांत पुर्नविचार करण्यात येईल परिस्थितीत सुधारणा न झाल्यास सर्व निर्बंध मागे घेण्यात येतील असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला.

करोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या अडीच महीन्यांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. मात्र लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात शासनाने अटी शर्थींवर दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. दुकाने सुरू करतांना सम विषम तारखेच्या फॉर्म्युल्यानूसार बाजारपेठा सुरू करण्यात याव्यात असे निर्देश शासनाने दिले. त्यानूसार नाशिक शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत सम विषम तारखेच्या फॉर्म्युल्यानूसार रस्त्याच्या उजव्या बाजुची दुकाने एक दिवस तर डावीकडील दुकाने दुसर्‍या दिवशी सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मात्र शनिवारपासूनच शहरातील सर्व दुकाने सुरू उघडण्यात आली. एकाच दिवशी सर्व दुकाने उघडल्याने बाजारपेठांमध्ये नागरीकांनी एकच गर्दी केली. महात्मा गांधी रोड, वकीलवाडी, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार, कापड बाजार, दहीपुल, भद्राकाली, गाडगे महाराज चौक, शालीमार परिसरात नागरिकांची तोबा गर्दी दिसून आली. मात्र महापालीकेने सम विषम तारखेच्या फॉर्म्युल्याबाबत ठरवून दिलेल्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन केल्याचे दिसून आले.

गर्दीमुळे सोशल डिस्टंन्सिंगचाही फज्जा उडाला. अनेक दुकानांत प्रशासनाने घालून दिलेल्या अटी शर्थींचे पालन होतांना दिसून आले. मात्र काही ठिकाणी तर या नियमांचा विसरच पडल्याच दिसून आले. शहरात एकिकडे करोना बाधितांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे सर्व बाजारपेठां खुल्या झाल्याने वाढत जाणारी गर्दी लक्षात घेता शहरात करोनाचा विळखा अधिकच घटट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत प्रशासन याबाबत अभ्यास करत असून परिस्थितीत सुधारणा न झाल्यास, व्यावसायिकांनी नियमांचे पालन न केल्यास निर्बंध मागे घेण्यात येउन पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला.

दोन महीन्यानंतर बाजारपेठा खुल्या झाल्याने गर्दी होणे स्वाभाविक आहे. परंतु सम विषम फॉर्म्युल्याने दुकाने उघडणे अपेक्षित आहे. यात महापालिकेने व्यावसायिकांसोबत समन्वय साधुन निर्णय घेणे गरजेचे आहे. परंतु एकुणच दोन तीन दिवसाचा आढावा घेतला असता बाजारपेठेत वाढती गर्दी लक्षात घेता धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली आहे. महापालिका आयुक्तांशीही चर्चा करणार आहे. व्यावसायिकांनी नियमांचे पालन न केल्यास निर्बंध पुन्हा मागे घेण्यात येतील.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी