पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत शुल्कवाढ नाही

व्यवस्थापन परिषदेचा निर्णय: 20 ते 30 टक्के शुल्कवाढीचा निर्णय घेतला मागे

savitribai phule pune university

नाशिक : करोना पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित अभ्यासक्रमांच्या शुल्कवाढीच्या निर्णयाला व्यवस्थापन परिषदेनी एक वर्षासाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे यंदाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षात कोणतीही शुल्कवाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक सोमवारी (दि.8) झाली. विद्यापीठाच्या शुल्क नियमन समितीने गेल्या काही महिन्यांपूर्वी सर्व अनुदानित व विनाअनुदानित अभ्यासक्रमांच्या शुल्कात सुमारे 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने शुल्कवाढीचे परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्याची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार होती. मात्र, शुल्कवाढ स्थगितीचा निर्णय झाल्याने विद्यापीठांना शुल्कवाढीचे परिपत्रक मागे घ्यावे लागणार आहे. विद्या परिषदेने शुल्कवाढी संदर्भात सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. करोनामुळे पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्याबाबत यंदा शुल्कवाढ करू नये, या प्रस्तावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. विद्यापीठाने शुल्कवाढीचा निर्णय घेतल्यानंतर विविध विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला होता. काही संघटनांनी आंदोलन करीत शुल्कवाढीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र, करोनामुळे विद्यापीठाने शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे स्वागत होत आहे.

साधारणत: 15 दिवसांपूर्वीच विद्यापीठाने शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यवस्थापन परिषदेनी त्याला सोमवारी मंजूरी दिली. एक वर्षासाठी एकाही महाविद्यालयात आता शुल्कवाढ केली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत चांगला निर्णय आहे.
-विजय सोनवणे, व्यवस्थापन परिषद सदस्य (पुणे विद्यापीठ)