संत्री विकायला नाशिकमध्ये आले अन् सिन्नरमधील स्पेअर पार्टस घेवून पळाले

दोन चोरट्यांना अटक; वाहनांच्या बॅटर्‍या, स्पेअर पार्टस जप्त

औरंगाबादहून नाशिकमधील फ्रुट मार्केटमध्ये संत्री विक्रीस आलेल्या चोरट्यांनी परत जाताना सिन्नरमधील बॅटरीचे दुकान व ट्रान्सपोर्ट कंपनीचे गोडाऊन फोडून स्पेअर पार्टस व बॅटर्‍या लंपास करणार्‍या दोन चोरट्यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या वाहनांच्या बॅटर्‍या, इलेक्ट्रीक मोटर, लोखंडी मोटर पंप, वेल्डींग वायरचे बंडल, ग्राईंडर व्हिल, कटींग सिल्क, टाटा आयशर, मोबाईल जप्त केला.

टाकळी (ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद) येथील शेख आजिम शेख बाहशहा (वय ४६), वाळुंजगाव (जि.औरंगाबाद) येथील वाजिद रफिक चौधरी (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

१० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी सिन्नर शहरातील उद्योगभगवन व संगमनेर नाका परिसरातील अविनाश कॉर्बो लिमिटेड कंपनीचे गोडाऊन व न्यु इंडिया अ‍ॅटो इलेक्ट्रिक अ‍ॅड बॅटरीचे बंद दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कंपनीचे व वाहनांचे इलेक्ट्रीक पार्टस, लोखंडी मोटर पंप, इलेक्ट्रीक मोटर, ग्राईंडर व्हील, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या बॅटर्‍यास असा एकूण सुमारे ९ लाख २६ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरु केला. चोरटे औरंगाबाद शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शेख आजिम शेख बादशहा याला अटक केली. चौकशीत त्याने जालना येथील तीन साथीदारांच्या मदतीने सिन्नरमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.

संशयित आरोपी ८ नोव्हेंबर रोजी नाशिक फ्रुट मार्केट येथे संत्री विक्रीसाठी घेवून आले होते. त्यानंतर ते दोन दिवस सिन्नरमध्ये मुक्कामी थांबले. संगमनेर नाका परिसरातील दुकानांची रेकी केली. १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री संशयित आरोपींनी बॅटरीचे दुकान व ट्रान्सपोर्ट कंपनीचे गोडाऊन फोडून स्पेअर पार्टस व बॅटर्‍या लंपास केल्या. पोलीस तपासात चोरीच्या बॅटर्‍या व स्पेअर पार्टस वाळुंजगाव (जि.औरंगाबाद) येथील वाजिद रफिक चौधरी याच्या साहिल एंटरप्रायजेस भंगार दुकानामध्ये विक्रीस ठेवल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी त्यास वाळुंजमधून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून टाटा आयशर (एमएच २१-सीटी २६२१) जप्त केली.

चोरटे निघाले सराईत गुन्हेगार

संशयित आरोपी शेख आजिम व त्याचे साथीदार आंतरजिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर औरंगाबाद, जालना, बुलढाणा, पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. शेख आजिमच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्याकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.