घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक-पुणे महामार्गावर करत होते वाहनचालकांची लूटमार; मात्र...

नाशिक-पुणे महामार्गावर करत होते वाहनचालकांची लूटमार; मात्र…

Subscribe

संगमनेर : पुण्याहून नाशिकला दुचाकीवरुन जाणार्‍या युवकास भररस्त्यात अडवत बंदुकीसह धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड व दुचाकी लंपास करणार्‍या लुटारुंच्या घारगाव पोलिसांनी अवघ्या १६ तासांत मुसक्या आवळल्या. पोलिसांनी पाच जणांना लॉजमध्ये अटक करुन त्यांच्या ताब्यातून ४१ हजार ३२० रुपये, एअरगन, धारदार कोयता, तीन दुचाकी, आठ मोबाईल, वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, आरसी बुक, पॅनकार्ड असा एकूण ३ लाख ६१ हजार ५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर बाळकृष्ण राऊत (वय ३७, रा. प्रथमेश अपार्टमेंट, समर्थनगर, वडाळा-पाथर्डी रोड, नाशिक) हे दुचाकी (एमएच १५-सीडब्ल्यू ३६८२) वरून पुण्याहून नाशिककडे जात होते. ते शनिवारी (दि.२५) रात्री 10.30 वाजेदरम्यान बोटा शिवारातील माळवाडी येथे आले असता सहा जणांनी त्यांना अडवले. तू आमच्या अंगावर का थुंकला, असे म्हणून सहा जणांनी राऊत यांना बंदुकीसह हत्याराचा धाक दाखवून त्यांना मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांच्याकडील सहा जणांनी दुचाकी, रोख रक्कम, हेडफोन असा मुद्देमाल लंपास केला.

- Advertisement -

राऊत यांनी रविवारी (दि.२६) सकाळी घारगाव पोलीस ठाणे गाठत आपबिती सांगितली. त्यानुसार घारगाव पोलिसांनी अनोळखी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. लुटारुंच्या वर्णनानुसार सहा जण लॉजमध्ये असल्याची माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांना मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास देशमुख, पोलीस नाईक संतोष खैरे, गणेश लोंढे, किशोर लाड, हरिश्चंद्र बांडे, अनिल भांगरे, महिला पोलीस वर्षा शिंदे यांनी रविवारी दुपारी पाच जणांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.पाच जणांकडून आणखी गुन्ह्यांच्या उकल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. महामार्गावरुन ये-जा करताना संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांनी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -