लग्न सोहळ्यात जिल्हाधिकार्‍यांच्या पाकिटावर चोरट्याचा डल्ला

लग्नसमारंभात बॅग चोरी करणारी मध्य प्रदेशची टोळी नाशिक शहर पोलिसांनी जेरबंद केली असतानाच, रविवारी (दि.३) आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त नाशिक दौर्‍यावर आलेल्या व्हीआयपी अतिथींसमवेत असलेल्या जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या पाकिटावर चोरट्याने चलाखीने डल्ला मारला. विशेष म्हणजे, व्हीआयपी अतिथी येणार असल्याने पोलिसांसह खासगी सुरक्षारचक तैनात असतानाही चोरट्याने थेट जिल्हाधिकार्‍यांचे लंपास केल्याचे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

रविवारी (दि.३) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छत्रपती संभाजीराजे भोसले हे नाशिक दौर्‍यावर होते. त्यामुळे शहरात कडक बंदोबस्त होता. आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाचा विवाहसोहळा गंगापूर रोडवरील बालाजी लॉन्समध्ये रविवारी (दि.३) संध्याकाळी पार पडला. ग्रेपपार्क येथील शासकीय अधिकार्‍यांसोबतची आढावा बैठक झाल्यानंतर अजित पवार, छगन भुजबळ, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय आदी वरिष्ठ अधिकारी सोहळ्यास उपस्थित होते. त्यामुळे लॉन्स परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी सूरज मांढरे लग्न सोहळ्यास आले तेंव्हा त्यांच्या आजूबाजूला पोलीस व खासगी सुरक्षारक्षक तैनात असताना चोरट्याने थेट जिल्हाधिकार्‍यांचे पाकिट लंपास केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह पोलीस अधिकारी लग्न सोहळ्यात उपस्थित असल्याने चोख सुरक्षाव्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही चोरी झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.