चोरट्यांचा पोलिसांवर दगडफेक करत हल्ला

रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांना दोनजणांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्याने त्यांनी दोघांना हटकले. पोलीस अटक करतील या भितीने चोरट्यांनी बचावासाठी पोलिसांवर दगडफेक करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी एका चोरट्यास अटक केली. तर दुसरा चोरटा अंधाराचा फायदा घेत फरार झाला. ही घटना शनिवारी (दि.७) मध्यरात्री दादासाहेब गायकवाड सभागृह परिसरात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई मनोज विष्णू गवळी यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोनजणांविरुद्ध पोलिसांवर हल्ला करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

संशयित वसीम मेहमूद सय्यद (२२, रा.भारतनगर, नाशिक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. किरण अशोक खंबाईत असे फरार झालेल्याचे नाव आहे.

शहरात गुन्हे घडण्याचे प्रमाण जास्त असणारी ठिकाणे, संवेदनशील स्थळे, गर्दीचे चौक अशा विविध ठिकाणी ‘क्यूआर कोड’ बसविण्यात आले आहेत. दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या समोरील जॉगींग ट्रकशेजारील पाण्याच्या टाकीजवळ क्युरआर कोड स्कॅन करण्यासाठी कर्तव्यावर असलेले पोलीस मनोज गवळी व निलेश शिंदे आले. त्यावेळी त्यांना संशयित आरोपी वसीम सय्यद व किरण खंबाईत हे दोघेजण वायर गोणीत भरताना दिसले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दोघांना हटकले. भयभीत झालेल्या दोघांनी बचावासाठी पोलिसांवर दगडफेक करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वसीम सैय्यद यास अटक केली. मात्र, अंधाराचा फायदा घेत किरण खंबाईत याने पळ काढला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सी. एम. श्रीवंत करत आहेत.

चोरट्यास पोलीस कोठडी

वसीम मेहमूद सय्यद यास अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सी. एम. श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक