चोरट्यांचा थेट विद्याधनावर डल्ला; शाळेची १६ लाखांची फी चोरली

मालेगाव : शहरात घरफोडीच्या प्रकारात वाढ मोठी वाढ झाली असून, चोरट्यांनी येथील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची जमा झालेली शालेय Aफि मुख्याध्यापकांच्या दालनातील कपाट फोडत लंपास केली. पोलिसांनी आठवड्याभरात चार चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून नऊ लाखांची रक्कम जप्त केली आहे. येथील हारून अन्सारी उर्दू प्रायमरी स्कूलमधील जे. ए. टी. कॅम्पस येथील मुख्याध्यापिका असून, त्यांच्या कार्यालयातील कपाटात मुलांची शैक्षणिक व परीक्षा फी, अशी १५ लाख ९९ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम होती.

संबंधित रक्कम चोरट्यांनी २८ डिसेंबरला पळविली. चोरट्यांविरुद्ध मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोडीमुळे येथे खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शहर पोलीस उपअधीक्षक तेगबिरसिंह संधू यांच्या विशेष पोलीस पथकाने गुप्त माहितीद्वारे सापळा रचला. त्यावेळी चोरटे येथील मनमाड चौफुली उड्डाणपुलाखाली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता, त्यात मोहम्मद सुलेमान मोहम्मद सलीम ऊर्फ माने (वय २३), मोहम्मद बिलाल शब्बीर अहमद ऊर्फ बिल्ला (२२, दोघे रा. इस्लामपुरा), मोहम्मद आमीन निसार अहमद ऊर्फ ताडे (२२, रा. मोमीनपुरा), अफताब अहमद अब्दुल अजीज ऊर्फ ग्याराबार (२४, रा. कमालपुरा) या चौघांकडून नऊ लाख १४ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले. चौघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कारवाईत प्रिती सावजी, सुनील दांडगे, इमरान सय्यद, दिनेश शेरावते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.