चोरांकडून आता वाहने लक्ष; गोल्फ क्लबवर ८ ते १० वाहनाच्या काचा फोडून चोरी

नाशिक : वाहनांच्या काचा फोडून चोरट्यांनी महागडे मोबाईल, जॅकेट, रोकड लंपास केल्याची घटना रविवारी (दि.२०) सहा वाजेदरम्यान त्र्यंबकरोडवरील गोल्फ क्लब येथील जॉगिंग ट्रॅक, जलतरण तलाव येथे घडली. याप्रकरणी मुबंईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी (दि.२०) सुटीचा दिवस असल्याने नागरिकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. नागरिकांनी वाहने गोल्फ क्लब परिसर, टिळकरोड, त्र्यंबकरोडवर पार्क केली होती. वाहनमालकांच्या गैरहजेरीत चोरट्यांनी आठ ते दहा चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. कारमालकांनी कारची पाहणी केली असता त्यातील किंमती ऐवज लंपास झाल्याचे आढळून आले. मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार श्वेता समीर भिडे यांनी शासकीय विश्रामगृहालगत असलेल्या गोल्फ क्लब मैदानाच्या रस्त्यावर त्यांची कार(एमएच १५ एचक्यु ९७२१) पार्क केली होती. या कारची काच फोडून चोरट्यांनी कारमधील सॅमसंगचा मोबाईल, जॅकेट आणि लेदरची बॅग लंपास केली. तर राजेंद्र खरात यांच्या कार(एमएच ०६ एडी ७७०१)ची काच फोडून चोरट्यांनी कारमधील ५ हजारांची रोकड, जॅकेट चोरून नेले. स्वप्निल सुधाकर येवले यांच्या कार(एमएच १५ बीएक्स ४७७६)ची काच फोडून १० हजार रुपयांची रोकड व जॅकेट तर, प्रवीण कुमार यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी साडेतीन हजार रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्योजक महेंद्र छोरिया यांच्या कारमधून चोरट्यांनी एक लाखांचा आयफोन १२ चोरुन नेला. ही बाब लक्षात येताच त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी चोरीची फिर्याद घेण्याऐवजी त्यांचा मोबाईल गहाळ झाल्याचा छापील अर्ज छोरीयांकडून भरुन घेतला. मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो पण सरकारवाडा पोलीस ठाण्यात मोबाइल गहाळ झाल्याची तक्रार नोंदवल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

जेलरोडलाही अशीच घटना

जेलरोड परिसरात राहत्या घरासमोर पार्क केलेल्या कारचे लॉक उघडून चोरट्याने कारमधील रोकड असलेली पर्स व साहित्य असा ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृषा महेंद्रकुमार ओझा (रा. ड्रिम घरकुल, शिवाजीनगर,आदर्शनगर, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ओझा यांची इर्टिगा कार (एमएच ४३ एटी ६९३६) राहत्या घरासमोर रस्त्यालगत पार्क केली असता, अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने कारचे लॉक उघडले. चोरट्याने कारमध्ये ३५ हजार रुपये असलेली पर्स, ९ हजारांचा एलइडी स्क्रीन, ४ हजारांचा साऊंड सिस्टिम यासह पर्समध्ये पॅनकार्ड, आधारकार्ड, एसबीआय, कोटक बँकेचे एटीएम व क्रेडिट कार्ड असा एकूण ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.