घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकरोड नाट्यगृहास ‘तिसरी घंटा’

नाशिकरोड नाट्यगृहास ‘तिसरी घंटा’

Subscribe

नाशिकरोड परिसरातील बहुप्रतीक्षित नाट्यगृहाच्या जागेतील चंदनाची ३० झाडे पुनर्रोपणास इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी (आयडब्लूएसटी) संस्थेचा हिरवा कंदील

नाशिकरोड परिसरातील बहुप्रतीक्षित नाट्यगृहाच्या जागेतील चंदनाची ३० झाडे पुनर्रोपणास इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी (आयडब्लूएसटी) संस्थेने हिरवा कंदील दाखवला आहे. या संदर्भात संस्थेच्या तज्ज्ञांनी नाशिकमध्ये येऊन पाहणी केली. या भेटीचा अहवाल बुधवारी (दि. ३१) महापालिकेच्या उद्यान विभागास प्राप्त झाला. हा अहवाल न्यायालयाला सादर झाल्यानंतर नाट्यगृह उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नाट्यगृह उभारणीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने ‘आपलं महानगर’ला सांगितले.

नाशिकरोड परिसरातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी नाट्यगृह उभारले जावे, अशी मागणी गेल्या २५ वर्षांपासून नगरसेवक करीत होते. तत्कालीन महापौर नयना घोलप – वालझाडे यांच्या कार्यकाळात या नाट्यगृहास मंजुरी मिळाली आणि तसा ठरावही त्यांनी केला. त्यानुसार नाशिकरोड बिटको पॉईंट परिसरातील हेमेंद्र आणि नरेंद्र कोठारी यांच्या १८ हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन करण्यात आले असून ही जागा महापालिकेकडे वर्गदेखील झाली आहे. या नाट्यगृह उभारणीस साधारणत: ३२ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने निविदा प्रसिद्ध करून संबंधित ठेकेदारास कार्यादेश दिला होता. मात्र, या जागेत ३० चंदनाची झाडे आढळून आलीत. ही झाडे दुर्मिळ असल्याने ती तोडता येत नाहीत. या संदर्भात काही पर्यावरण प्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हापासून म्हणजेच सुमारे सहा वर्षांपासून या जागेवर बांधकाम करण्यास न्यायालयाची स्थगिती आहे. निरी (नॅशनल एनव्हारमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट)ने या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले; परंतु चंदनाच्या झाडांचे पुनर्रोपण होते की नाही याबाबत निरीही साशंक असल्याने त्यांनी बेंगळुरू येथील आयडब्लूएसटी या तज्ज्ञ संस्थेचे मार्गदर्शन करण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशान्वये या संस्थेने जागेची आणि चंदनाच्या झाडांची पाहणी केली.

- Advertisement -

काय आढळले पाहणीत

आयडब्लूएसटी संस्थेचे डॉ. ए. मुथ्थूकुमार आणि एम. व्ही. दुराई या दोन्ही तज्ज्ञांनी नाट्यगृहाच्या जागेची पाहणी केली. त्यातील ३० चंदनाच्या झाडांमध्ये १५ झाडे सशक्त आणि १५ कीड लागलेली आढळून आली. ही झाडे पुनर्रोपित करता येतील, असा अहवाल संबंधित तज्ज्ञांनी महापालिकेत पाठवला आहे.

NMC_shivaji aamale
शिवाजी आमले, उद्यान अधिकारी

चंदनाच्या झाडांचे पुनर्रोपण करता येते की नाही याविषयी निरीला शंका होती. त्यामुळे तज्ज्ञ संस्थेने पाहणी केली. हा अहवाल मला आजच प्राप्त झाला. तो आता उच्च न्यायालयात सादर केला जाईल.  – शिवाजी आमले, उद्यान अधिकारी

- Advertisement -
sambhaji moruskar
संभाजी मोरुस्कर, नगरसेवक

नाट्यगृह उभारणीस अडीच कोटींचा निधी आमदार बाळासाहेब सानप यांनी राज्य शासनाकडून मंजूर करून आणला आहे. उरला प्रश्न चंदनाच्या झाडांचा. ही झाडे मध्यवर्ती कारागृहात पुनर्रोपित करण्यासाठी मी गुरुवारी पत्र देणार आहे. – संभाजी मोरुस्कर, नगरसेवक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -