सिन्नर-शिर्डी महामार्गावर हजारो झाडांची कत्तल

चौपदरीकरण : पर्यावरणाची प्रचंड हानी वृक्षप्रेमी, प्रवाशांकडून नाराजी

sinnar

अमोल निरगुडे : सिन्नर

सिन्नर – शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरनाच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र, रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या हजारी झाडांची कत्तल करण्यात येत आहे. यामुळे रस्त्याला भकास स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे रस्त्याने जाणार्‍या प्रवासी व वृक्षप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या महामार्गावर साईंदर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसाठी स्वतंत्र पालखी मार्गासह 60 किलोमीटरचे हे काम 18 महिन्यांच्या आत मुदतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने कंबर कसली असून त्यामुळे साईभक्तांचा प्रवास सुखकर होणार आहे. रस्ता रुंदीकरणामुळे अपघातांनाही ब्रेक लागणार आहे. तसेच गुरेवाडी भागातून जाणार्या सिन्नर-पुणे महामार्गाला सिन्नर-शिर्डी हायवे वळण रस्त्याद्वारे जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक आणि पुणेमार्गे येणाच्या साईभक्तांना सिन्नर शहरात येण्याची गरज पडणार नाही.

साहजिकच शहरवासीयांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होईल. मात्र यासाठी अनेक वर्षे जुन्या वृक्षांची कत्तल करून निसर्गाची हानी करणे कितपत योग्य असल्याची खंत वृक्षप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. यामध्ये तोडण्यात येणार्‍या वृक्षांमध्ये असे काही वृक्ष आहे की ते सुमारे 50 वर्ष जुने आहे. यामध्ये मोठे वड, पिंपळ, कडूलिंब, बाभूळ, चिंच, आंबा आदी वृक्षांचा समावेश आहे. कत्तल होणार्‍या वृक्षांची संख्या इतकी मोठी आहे की दिवसाला साधारणतः 10 ते 15 ट्रक भरून लाकडे गोळा केली जात आहे. यामुळे उन्हाळ्यात या महामार्गावर प्रवाश्यांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहे.

सिन्नर-शिर्डी महामार्गावर झाडांची कत्तल
सिन्नर-शिर्डी महामार्गावर झाडांची कत्तल

वृक्षाच्या बदल्यात वृक्ष; वृक्षप्रेमींनी आग्रही मागणी

महामार्गाच्या दुतर्फा कापण्यात आलेल्या वृक्षांमुळे मोठ्या प्रमाणावर निसर्गाची हानी झाली आहे. मात्र, ज्या कंपनीला हे काम दिले आहे त्या कंपनीने ह्या तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात त्याच पटीत पुन्हा नवीन महामार्गाच्या दुतर्फा नवीन वृक्षांची लागवड करून त्यांची देखभाल घ्यावी अशी मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे. त्यामुळे सिन्नर शिर्डी या महामार्गाचे काम मोंन्टे कारलो या कंपनीला दिले आहे ते हे कसे करतील याकडे लक्ष आहे.