साडेतीन शक्तिपीठ, नारीशक्ती चित्ररथाचे दिमाखात स्वागत

नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर संचलन सोहळ्यात गौरवान्वित झालेल्या साडेतीन शक्तिपीठ व नारीशक्ती चित्ररथाचे सादरीकरण वणीत मोठ्या उत्साहात करण्यात आले. दिल्लीच्या कर्तव्यपथावर संचलन झालेल्या चित्ररथाचे वणी शहरात स्वागत करण्यात आले. शैक्षणिक संस्थामाधील शालेय विद्यार्थी यांनी बहारदार नृत्य व विविध पेहराव करत चित्ररथ शोभायात्रेच्या कार्यक्रमात रंगत आणली शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व विविध स्तरातील नागरिकांनी शोभायत्रेत सहभाग घेतला. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रेक्षकांची मने जिंकलेल्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा व्दितीय क्रमांक मिळाला.

साडेतीन शक्तिपीठावर आधारित या चित्ररथाचे प्रदर्शन वणीत झाल्याने मोठ्या उत्साहाचे व चैतन्यमय वातावरण तयार झाले होते. गुरुवारी (दि. १६) सकाळी १० वाजता वणी खंडेराव महाराज मंदिर पटांगणातून या चित्ररथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. दिंडोरी तहसीलदार पंकज पवार व वणी पोलीस ठाण्याचे सपोनि नीलेश बोडखे यांनी चित्ररथाचे पूजन करून नारळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. खंडेराव मंदिर, बसस्थानक, वणी पोलीस ठाणे,कॉलेज रस्त्यावरुन हा चित्ररथ ग्रामपंचायती समोर आल्यावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

दिल्लीत कर्तव्यपथावर संचलन सोहळ्यात गौरवान्वित आलेला हा महाराष्ट्राचा चित्ररथ वणी च्या पावनभुमीत आल्याने वणी ग्रामस्थांकडून मोठ्या जल्लोशात स्वागत करण्यात आले.या सादरीकरणात शालेय विद्यार्थांचा सहभाग होता.सादरीकरण दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य, आदिवासी नृत्य सादर केले. लेझीम पथकाने कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमास हाजारो महिला भाविकांनी हजेरी लावली होती.या चित्ररथाचे संयोजक जयेश खोट यांचा सत्कार वणी पोलीस ठाण्याचे सपोनि नीलेश बोडखे, सरपंच मधुकर भरसठ, उपसरपंच विलास कड, महेंद्र बोरा, महेंद्र पारख यांच्या हस्ते करण्यात आला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा प्रसंग टिपण्यासाठी वणीकरांसह भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली. या कार्यक्रमाचे नियोजन वणी येथे चित्ररथ समितीचे दर्शन दायमा, पियूष भवर, भास्कर पाटील, चेतन कुर्‍हाडे, प्रशांत कड, बाळासाहेब घडवजे, मयूर जैन, सतीश जाधव, संतोष दुसाने, प्रमोद भांबेरे, दिगंबर पाटोळे, आबा मोर आदी समिती सदस्य, वणी सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद थोरात व विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले.