लासलगाव जळीतप्रकरणातील मुख्य संशयितासह तिघांना अटक

पीडितेवर मुंबईत उपचार सुरू; व्हिडीओ व्हायरल झाल्याने घटनेबाबत गोंधळ

हिंगणघाट जळीत प्रकरणानंतर राज्यभर संतापाची लाट पसरलेली असताना शनिवारी (दि.१५) लासलगावमधील बसस्थानकावर ३२ वर्षीय महिलेला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत महिला ६७ टक्के भाजली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. शनिवारी मध्यरात्रीच महिलेला पुढील उपचारासाठी मुंबईतील मसीना रुग्णालयात हलविण्यात आले. तत्पूर्वी, नाशिक दौर्‍यावरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलेच्या प्रकृतीची विचारपूस करत घटनेतील दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुख्य संशयित रामेश्वर ऊर्फ बाळा मधुकर भागवत, दत्तू बाळू जाधव व नीलेश पद्माकर केंदळे (रा. टाकळी विंचूर) या तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या जबाबाने गोंधळ निर्माण झाला आहे.

लासलगाव बसस्थानकात शनिवारी (दि.१५) पीडित महिला आली असता त्या ठिकाणी आधीच रामेश्वर भागवत, दत्तू जाधव व नीलेश केंदळे हजर होते. तिघा संशयितांनी काही कळण्याच्या आतच पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. प्रसंगावधान राखत काही प्रवाशांनी आग विझवली. उपचारासाठी महिलेला तिच्या भावाने सुरुवातीला लासलगावमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारार्थ नाशिकला नेण्यास सांगितले. त्यानुसार महिलेला शनिवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दत्तू जाधव व नीलेश केंदळे यास अटक केली. रुग्णालयात उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकार्‍यांनी महिला ६८ टक्के भाजली असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह शनिवारी (दि.१५) रात्री १० वाजेदरम्यान जिल्हा रुग्णालयात येऊन पिडीतेच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय गांगुर्डे आदी उपस्थित होते. शनिवारी मध्यरात्री पीडितेची प्रकृती गंभीर झाल्याने जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी मुंबईतील भायखळा येथील मसीना रुग्णालयात उपचारार्थ हलविण्याचा निर्णय घेतला. तेथे पीडितेवर रुग्णालयात डॉ. अभ्यंकर आणि त्यांचे पथक उपचार करत आहे.

पीडितेला तीन अपत्ये
पीडित महिलेला तीन अपत्ये आहेत. महिलेच्या पहिल्या पतीचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर तिचा रामेश्वर भागवतशी दोन महिन्यांपूर्वी निमगाव वाकडा येथील रेणुका माता मंदिरात विवाह झाला. मात्र, रामेश्वर दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे समजताच दोघांमध्ये वाद सुरू होते. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

पेटवले की पेटवून घेतले?
महिलेला पेटवून दिल्याचे सांगितले जात असले तरी आपापसांतील वादातून तिने स्वत:च बाटलीत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेतल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे नेमके तिला पेटवले गेले की तिने स्वत:च पेटवून घेतले, हा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पीडितेच्या जबाबाने गोंधळ
पीडित महिलेने जबाब दिला असून, त्यात म्हटले आहे की, माझ्या पतीचा मला पेटवण्याचा उद्देश नव्हता. आमच्यात सकाळपासून वाद सुरू होता. मी बसस्थानकाजवळ स्कुटीमध्ये पेट्रोल भरत होते. तेव्हा तो आला आणि पुन्हा वाद झाला. त्यानंतर तो मला म्हणाला की, मी गाडीत पेट्रोल भरतो. अशात दोघांच्या भांडणात दोघांच्याही अंगावर पेट्रोल सांडले. त्यानंतर त्याने काडीपेटी काढून काडी ओढली, पण ती माझ्या बाजूला आली आणि त्यावेळी तो घाबरून पळाला. पीडितेच्या या जबाबामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

मुख्य संशयिताचा व्हिडीओ व्हायरल
जळीत प्रकरणातील मुख्य संशयित रामेश्वर भागवत याचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, जळीत प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही. महिला आमच्या घराशेजारी राहते. त्यामुळे आईवडील मदत करायचे. ती लग्नाची मागणी घालत होती. पण तिला तीन मुले असल्याने मी लग्नास नकार दिला. तरीही, ती त्रास देत होती. तिने लासलगाव बसस्थानकात बोलवल्याने त्या ठिकाणी आलो असता पुन्हा वाद झाला. त्यातून तिने स्वत: हून पेट्रोल टाकून पेटवून घेतले. मी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घाबरल्याने तेथून निघून गेलो.