नाशिक शहरात दोन दिवसांत तीन मुलींचे अपहरण

पालकांमध्ये भीतीचे वातावरण; शहर पोलिसांचा तपास सुरु

नाशिक : शहरात मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. शहरात दोन दिवसांत तीन मुलींचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले आहे. शहरात अपहरण करणार्‍यांची टोळी सक्रिय झाली असावी, अशी भीती व्यक्त केली जात असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या अपहरणांच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.

पहिल्या घटनेनुसार, अनोळखी व्यक्तीन महालक्ष्मी नगर, महाराष्ट्र बेकरीजवळ, म्हसरूळ येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना बुधवारी (दि.२५) घडली. तिचा कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कोठेही आढळून आली नाही. तिचे अनोळखी व्यक्तीने अपहरण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आहिरे करत आहेत.

दुसर्‍या घटनेनुसार, अनोळखी व्यक्तीने गुरुवारी (दि.२६) अल्पवयीन मुलीला सरकारी बाथरुमजवळ, खालचे चिंचोळे, अंबड येथे आमिष दाखवून पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. तिच्या कुटुंबियांना तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कोठेही आढळून आली नाही. तिला अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा आरोपी तिच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी महिलेने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.

तिसर्‍या घटनेनुसार, मैत्रिणीच्या ओळखीतील व्यक्तीने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि.२५) सकाळी देवी मंदिराजवळ, शालिमार, नाशिक येथे घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे करत आहेत.