प्रेमसंबंधातून युवकाच्या गळ्यावर वार, तीन संशयित ताब्यात

नाशिकरोड : येथील आढाव मळ्यात राहणा-या युवकाच्या गळ्यावर धारदार शस्राने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटनेने खळबळ उडाली आहे, जखमीवर आडगाव मेडिकल काॅलेज येथे उपचार सुरु असून प्रेम प्रकरणातून हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, जेलरोड येथील आढाव मळ्यात पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा इरफान हुबे शेख (२४) मुळ राहणार उत्तर प्रदेश हा काही महिन्यांपासून इलेक्ट्रीकची कामे करत होता, रविवारी (दि.३) रात्री आठच्या सुमारास आगरटाकळी परिसरातील उसाच्या शेताजवळ शेख हा जखमी अवस्थेत मिळून आल्यानंतर त्याला आडगाव मेडिकल काॅलेज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक निलेश माईनकर व अधिकारी यांनी घटनास्थळावरुन मोटार सायकल (आरजे ०९ एसएक्स ३९९२) ताब्यात घेत तपास करत जखमी शेख याच्या घरापासून जवळ राहणारी संशयित त्याचा साथीदार व एका महिलेला ताब्यात घेतले आहे. जखमी युवकाचे संशयिताच्या पत्नी बरोबर अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान शेख याच्यावर यशस्वी शस्रक्रिया झाल्याचे समजते, संशयिता विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.