मोहदरी घाटात बर्निंग बसचा थरार

नाशिकहून पुण्याला जाणार्‍या खासगी बसला एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.१३) रात्री ९.१५ वाजेदरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात घडली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बस पूर्णपणे जळून खाक झाली. आग लागल्याचे वेळीच लक्षात येताच चालकासह प्रवाशी बसमधून बाहेर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील स्लीपर कोच खासगी बस (एमएच ०९-सीव्ही ३०६९) शुक्रवारी रात्री ३५ प्रवाशांना घेऊन कोल्हापूरला जाण्यासाठी नाशिक-पुणे महामार्गाने निघाली. बस रात्री ९ वाजेदरम्यान मोहदरी घाटात आली. त्यावेळी अचानक बसने पेट घेतला. काही समजण्याच्या आतच आगीन रौद्ररुप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच चालकासह प्रवाशी बसमधून बाहेर आले.त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग विझवता न आल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच एम.आय.डी.सी.सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी येत मदतकार्य सुरु करत वाहतूक सुरळीत केली.