पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघ होतोय पाणीदार

१९ गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी

लासलगाव :  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जलजीवन मिशन अंतर्गत येवला मतदारसंघात निफाड तालुका परिसरातील १९ गावांमध्ये नवीन नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळालेली आहे. या योजनांसाठी निधीची तरतूद देखील करण्यात आलेली असून प्रस्तावित योजनांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यात नुकत्याच २५ नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आहे. यातील काही योजनांच्या कामांना सुरुवात देखील झालेली आहे. त्यानंतर आता येवला मतदारसंघातील निफाड तालुका परिसरातील १९ गावांतील नवीन नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळालेली असून येवला मतदारसंघाची पाणीदार होण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल होत आहे.

निफाड तालुका परिसरात मंजूर झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनांमध्ये कोळगाव योजनेसाठी १ कोटी ५७ लक्ष निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच सारोळे खु. योजनेसाठी १ कोटी ४४ लक्ष, नांदूर मध्यमेश्वर योजनेसाठी ३ कोटी ७३ लक्ष, खडक माळेगाव योजनेसाठी ३ कोटी ५० लक्ष, शिरवाडे वाकद योजनेसाठी १ कोटी ५० लक्ष, देहेगाव ग्रामपंचायत व वाहेगाव योजनेसाठी ३८ लक्ष, धानोरे रुई योजनेसाठी २३ लक्ष ९७ हजार, वाकद योजनेसाठी ६२ लक्ष १२ हजार, वनसगाव योजनेसाठी १ कोटी ७६ लक्ष, ब्राम्हणगाव वनस योजनेसाठी ९० लक्ष ८६ हजार, पाचोरे खु. योजनेसाठी १ कोटी ४ लक्ष, गोंदेगाव योजनेसाठी १ कोटी ६५ लक्ष, मरळगोई बु. योजनेसाठी १ कोटी १२ लक्ष, मानोरी खु.भरवस योजनेसाठी १ कोटी ६७ लक्ष, देवगाव योजनेसाठी १ कोटी ६४ लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे.

त्याचबरोबर कानळद, वेळापूर योजनेसाठी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तर खेडलेझुंगे योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून पाचोरे बु. योजनेसाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या सर्व प्रस्तावित योजनांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार असून या १९ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.