निओ मेट्रो प्रकल्पाला अंतिम मंजुरी द्यावी; खा. गोडसेंची मागणी

खासदार गोडसे यांची केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे मागणी

नाशिक : भविष्यात शहरात वाहतुकीची होणारी भीषण कोंडी लक्षात घेऊन शहरात निओ मेट्रोला राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. सदरचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र वर्ष उलटूनही केंद्राकडून मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे भविष्यात शहरात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी निओ मेट्रोच्या प्रस्तावाला लवकरात लवकर अंतिम मान्यता देऊन तातडीने प्रत्यक्ष कामास प्रारंभ करावा अशी आग्रही मागणी खासदार गोडसे यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदिपसिंग पूरी यांच्याकडे केली आहे.

नाशिक शहर आणि परिसरात भविष्यात होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे यांनी शहरात मेट्रो व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहे. निओ मेट्रो प्रकल्पाला सन 2019 साली महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे. पुढील मान्यतेसाठी राज्य शासनाने प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला आहे. दरम्यानच्या काळात केंद्र शासनाने राज्य शासनाकडून आलेल्या या प्रस्तावाची सविस्तर स्कूटनी करून आणि आवश्यक त्या त्रुटी पूर्ण करून घेतल्या आहेत. केंद्र शासनाकडून या प्रस्तावाला आता फक्त अंतिम मंजुरी मिळणेच बाकी आहे.

निओ मेट्रोसाठी दोन मार्गिका असणार आहे. पैकी एक मार्गिका मुंबई नाका- सीबीएस- आशोकस्तंभ – गंगापूर अशी तर दुसरी मार्गिका गंगापूर- सातपूर एमआयडीसी – त्र्यंबकरोड – सीबीसी अशी असणार आहे. या दोनही मार्गिका सीबीएस चौकात एकत्र येणार असून तेथून नाशिकरोड रेल्वे स्थानकापर्यंत एकच मार्गिका असणार आहे. मुंबई नाका ते गंगापूर या मार्गीकेचे अंतर बारा किलोमीटर असून या दरम्यान दहा रेल्वे स्थानके असणार आहेत. दुसरी मार्गीका वीस किलोमिटरची असून या दरम्यान वीस स्टेशन असणार आहेत. निओ मेट्रोची मार्गीका एकून बस्तीस किलोमिटरची असून या दोनही मार्गीकांवर एकूण तीस रेल्वे स्थानके असणार आहे. या प्रस्तावाची वर्षभरापूर्वीच संपूर्ण स्कूटणी केंद्राकडून पूर्ण झालेली आहे. भविष्यात शहरात होणारे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी निओ मेट्रोच्या प्रस्तावाला लवकरात लवकर अंतिम मान्यता देऊन तातडीने प्रत्यक्ष कामास प्रारंभ करावा अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदिपसिंग पूरी यांच्याकडे केली आहे.