Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी चंद्रकांतदादांच्या विश्रामस्थळी आज ‘राज’योग

चंद्रकांतदादांच्या विश्रामस्थळी आज ‘राज’योग

राज ठाकरे यांचे शुक्रवारी (दि.16) नाशिकमध्ये आगमन

Related Story

- Advertisement -

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शुक्रवारी (दि.16) नाशिकमध्ये आगमन झाले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील हे शनिवार (दि.17) पासून नाशिक दौर्‍यावर येत आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते योगायोगाने शासकीय विश्रामगृह येथेच मुक्कामाला आहेत. महापालिका निवडणुकीत भाजप-मनसेची युती होण्याची चर्चा सुरु असतानाच हा अनोखा ‘राज’योग जुळून आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे शुक्रवारी (दि.16) नाशिकमध्ये दाखल झाले असून, निवडक पदाधिकार्‍यांशी चर्चा करत त्यांनी आढावा घेतला. तसेच शनिवारी (दि.17) सकाळी कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार असल्याने मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये होत आहेत. या निवडणुकांसाठी आता जेमतेम सहा महिने शिल्लक राहिल्याने राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून राज ठाकरे हे शुक्रवारपासून नाशिक दौर्‍यावर आले आहेत.सायंकाळी सात वाजता त्यांचे नाशकात आगमन झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार आणि जेष्ठ नगरसेवक सलीम शेख यांनी त्यांचे स्वागत केले. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे आले आहेत. तीन दिवसांच्या दौर्‍यात पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांसमवेत चर्चा करणार असून आगामी निवडणुकीची व्यूव्हरचना आखणार असल्याचे समजते. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असताना पक्षाचे स्थानिक ज्येष्ठ नेते व युवा फळीतील पदाधिकार्‍यांमध्ये धुसफूस सुरू आहे. तरुण फळीला पक्षातील ज्येष्ठ मंडळी काम करू देत नसल्याची तक्रार आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा पक्षांतर्गत संघर्ष परवडणारा नाही. त्यामुळे नाराजांना शांत करून पक्षशिस्तीची घडी बसविण्यासाठी राज ठाकरे यांचा हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.

निवडक पदाधिकार्‍यासमवेत चर्चा
राज ठाकरे यांचे शासकीय विश्रामगृहावर आगमन झाल्यानंतर त्यांनी पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.प्रदीप पवार, माजी महापौर अशोर मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अकुंश पवार, जेष्ठ नगरसेवक सलिम शेख या निवडक पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्याचा मनोदय व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत राज ठाकरे यांनी या नेत्यांसमवेत चर्चा केल्यानंतर शनिवारी अन्य पदाधिकार्‍यांसमवेत चर्चेचा कार्यक्रम निश्चित केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

- Advertisement -