घरमहाराष्ट्रनाशिकटोइंग शिस्तीसाठी की वसुलीसाठी?

टोइंग शिस्तीसाठी की वसुलीसाठी?

Subscribe

टोइंग कर्मचार्‍यांच्या मुजोरीवर नाशिककरांच्या संतप्त प्रतिक्रिया

टोईंग कर्मचार्‍यांच्या मुजोरीबद्दल ’आपलं महानगर’ने मंगळवारी (दि.९) वाहनचालकासह वाहनाला उचलल्याचे सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर नाशिककरांनीही सोशलमीडियाद्वारे व्यक्त होत आपल्या भावनांना वाट करून दिली. मुद्दाम कुणी नियम मोडत नाही, केवळ पर्याय नाही म्हणून नाईलाजास्तव पार्किंग करावी लागते. वाहनधारकांची ही चूक लक्षात आणून देत पर्याय दाखवल्यास वाहनधारकही नियमाने वागतील. मात्र, टोइंगची पद्धती पाहता ही यंत्रणा शिस्त लावण्यासाठी आहे की दंड वसूलीसाठी असा प्रश्न पडतो. टोइंग कर्मचारी नेहमीच अरेरावीच्या भाषेत बोलत असतात. सामान्य माणूस पोलिसी खाक्याला घाबरून त्याच्याविरुद्ध कृती टाळतो. त्यांना टोइंग वाहनावरील पोलिसांची साथ मिळते, असा सूर या प्रतिक्रियांमधून पुढे आला. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया…

काय म्हणतात नाशिककर…

गाडीवरून खाली उतरवले

गाडी उचलणारे सर्रास धमकी देतात. आजचाच घडलेला प्रसंग सांगतो. मित्र नारळपाणी घेण्यासाठी बायकोसह मुलाला घेऊन गेला होता. त्याचा चार वर्षांचा मुलगा पुढे बसलेला होता. त्याची बायको दुकानदाराकडून नारळ घेत असतानाच टोइंगवरील मुलगा तिथे आला आणि मित्राच्या खांद्यावर हात ठेवून त्याला गाडीवरून उतरायला सांगितले. मित्राने त्याला प्रत्युत्तरादाखल विचारणा केली असता टोइंग कर्मचार्‍याने अरेरावी भाषेत धमकी देत, ‘गाडी नो-पार्किंगमध्ये आहे, उतर खाली आणि गाडी घ्यायला तिकडे ये’ अशी भाषा वापरली. हे सर्व पोलीस अधिकार्‍यांसमोर घडले. मात्र त्यांनी चकार वाक्य काढले नाही. सर्वसामान्य माणूस वाद घालण्यात पडत नाही.  – अमोल पवार

- Advertisement -

ही हुकूशाही आहे का?

टोइंगवाल्यांचे हे नेहमीचेच झाले आहे. यावर स्मार्ट होणार्‍या प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. ठेकेदाराने नेमून दिलेले काम करावे. सोबत असणार्‍या पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे. ठेकेदार आणि प्रशासन मुळातच जनतेचे सेवक आहेत. मुजोरी दाखवणारे मालक नाहीत आणि घडलेला प्रकार हुकूमशाही समजावी का?
– सागर आंधळे, नागरिक

लोक आंदोलन छेडतील

पोलिसांनी टोईंग कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवावे. हे लोक अतिशय उद्धटपणे वागतात. वाहनासोबत असलेल्या पोलिसांनी या कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवायला हवे. अन्यथा जनता त्यांच्याविरोधात आंदोलन करेल.– विशाल जोशी

- Advertisement -

सामान्यांना त्रास

टोईंगवाल्यांना लोकांच्या मदतीसाठी ठेवले आहे. मुजोरी करण्यासाठी नाही. त्यामुळेच सर्वसामान्य माणसाला त्रासाला सामोरे जावे लागते आहे. मुजोरी करणार्‍यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.– अमोल घुगे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -