दुचाकी चोरट्यांचा टॉप गिअर; गुन्ह्यांची रिघ

अंबडसह पंचवटी, आडगाव, गंगापूर, उपनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची वाढ

नाशिक : नाशकात गुन्हेगारी घटनांचा आलेख चढाच असताना आता दुचाकी चोरट्यांनीही टॉप गिअर टाकल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना पाहता कुठल्याच परिसरात दुचाकी सुरक्षित नसल्याचे दिसून येते. बुधवारी (दि. २९) पोलीस प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार शहरातून विविध ठिकाणांहून तब्बल पाच दुचाकी चोरीस गेल्याचे समोर येते. या घटनांप्रकरणी अंबडसह पंचवटी, गंगापूर, उपनगर, आडगाव पोलीस ठाण्यांमध्ये संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. दरम्यान, दुचाकीच नव्हे तर शहरातून आता चारचाकी वाहनेही चोरीस जाण्याच्या घटना घडत असल्याने वाहनधारकांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

अंबड पोलीस ठाणे

अंबड पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, ठका कारभारी कोल्हे (रा. साईबाबा नगर, महाकाली चौक, जय नगर, सिडको) यांची दुचाकी चोरीला गेली. संभाजी स्टेडीयमच्या पाठीमागील पार्किंगमध्ये बुरकुले हॉल परिसरात उभी केलेली त्यांची काळ्या रंगाची दुचाकी (क्र. एमएच १५ जीएच ८३५६) ही चोरीस गेली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार शेख पुढील तपास करत आहेत.

गंगापूर पोलीस ठाणे

गंगापूर पोलीस ठाण्यात विकास मनोहर तर्खडकर (रा. फ्लॅट नं. १८, सरला अपार्टमेंट, शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी उभी केलेली तपकिरी रंगाची होंडा अ‍ॅक्टिव्हा (क्र. एमएच १५ जीएस ५४६९) ही अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस नाईक मोरे पुढील तपास करत आहेत.

उपनगर पोलीस ठाणे

शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात बिहारी यदू रॉय (रा. पाथर्डी रोड, शिवाजी नगर पेट्रोल पंपाच्या समोर, वडनेर दुमाला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, देवळाली गाव येथील दर्गेसमोर असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ त्यांनी उभी केलेली काळ्या रंगाची पॅशन-प्रो (क्र. एमएच १५ डीपी ९६८३) ही दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे हवालदार सातभाई अधिक तपास करत आहेत.

आडगाव पोलीस ठाणे

आडगाव पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, आशिष दत्तू चौरे (रा. फ्लॅट नं. ४, साई हाईट्स, निलगिरी बाग, कैलास नगर, नाशिक) यांची दुचाकी त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमधून चोरीस गेली आहे. केटीएम कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी (क्र. एमएच ३९ एक्स ०७६७) असे दुचाकीचे वर्णन असून, ती चोरीस गेल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार लोहकरे पुढील तपास
करत आहेत.

पंचवटी पोलीस ठाणे

पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, वनिता मनोहर पेखळे (रा. प्लॉट नं. २९, दामोदर नगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक) यांची होंडा कंपनीची काळ्या रंगाची अ‍ॅक्टिव्हा (क्र. एमएच १५ एफजे ५५३६) ही दुचाकी हिरावाडी परिसरातील सप्तशृंगी हॉस्पिटलच्या गेट समोरून चोरीस गेली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस नाईक खाजेकर अधिक तपास करत आहेत.