नाशिक जिल्ह्यात गड-किल्ल्यांसह पर्यटनस्थळे बंद

कोरोना प्रादूर्भाव वाढल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बुधवारी पुन्हा जिल्हा प्रशासनाने नव्याने आदेश काढत धरण परिसर, किल्ले, पर्यटनस्थळांवर नागरिकांना जाण्यास बंदी केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सुटीच्या कालावधीत तसेच वीकेंडला धरण परिसरात विकसित करण्यात आलेल्या पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात.

परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे पर्यटनस्थळांवर होणारी गर्दी कोरोनाचा संसर्गवाढीस कारणीभुत ठरू शकते, याकरीता आता या पर्यटस्थळांवर पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात आजमितीस १२ हजार ७५९ सक्रीय रुग्ण आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली.

मात्र शनिवार, रविवार सुटीच्या दिवशी हे नियम अक्षरशः पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता प्रशासनाने कठोर पावलं उचलत पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १९ जानेवारीपासून हे निर्बंध लागू करण्यात आले असून पुढील निर्णय होईपर्यंत पर्यटकांना या ठिकाणी जाण्यास मज्जाव असेल. अन्यथा कारवाई केली जाईल.

या ठिकाणी असेल पर्यटकांना मज्जाव

जिल्ह्यातील ब्रम्हगिरी पर्वत, अंजनेरी पर्वत, दुगारवाडी धबधबा, हरिहर किल्ला, पहिणे, भावली धरण, वैतरणा धरण, गंगापूर धरण परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

वाढत्या संसर्गावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागासह महापालिका, नगरपालिका सर्वच प्रयत्न करीत आहेत. प्रादूर्भाव अधिक वाढू नये, यासाठीच बंदिस्त पर्यटनस्थळांसह आता खुली पर्यटनस्थळेही बंद करण्यात आली आहेत. प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी, कोरोना त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करावे. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक