घरमहाराष्ट्रनाशिकशहरात सुरू होणार टोइंग

शहरात सुरू होणार टोइंग

Subscribe

बेशिस्त दुचाकी व चारचाकी वाहनचालकांमुळे रस्त्यांवर वाढली वाहतूक कोंडी

शहरात लॉकडाऊन शिथील झाल्यापासून रस्त्यावर रहदारी वाढली असून, बेशिस्त दुचाकी व चारचाकी वाहनचालकांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढली आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यासह बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे टोइंग व्हॅनमार्फत कारवाई सुरू होणार आहे. चार टेम्पो व तीन क्रेनमार्फत नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.

नो-पार्किंगमधील दुचाकी, चारचाकी वाहने शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून खासगी ठेकेदारामार्फत टोइंग करून नेली जाणार आहेत. संबंधित वाहनधारकांकडून निश्चित केलेल्या दरानुसार दंड आकारला जाणार आहे. टोइंग प्रक्रियेचा शासकीय कागदोपत्री कारभार अंतिम टप्प्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडून कार्यादेश सोमवारी (दि.२१) काढला जाणार आहे.

- Advertisement -

पोलीस प्रशासनाकडून तीन वर्षांपूर्वी वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या टोइंग कारवाईला-२०१९ मध्ये पूर्णविराम देण्यात आला होता. दोन वर्षानंतर शहर पोलिसांनी शहरातील वाढत्या बेशिस्त वाहन पार्किंगला शिस्त लावण्याच्या उद्देशाने खासगी कंपनीला ठेका देऊन टोइंगची सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोमवार किंवा मंगळवारी शहरात टोइंग कारवाईला प्रारंभ होणार आहे. याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून, श्रमसाफल्य कंपनीला तीन महिन्यांच्या करारावर हा ठेका पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आला आहे. टोइंग व्हॅन कारवाईबाबत हरकती, समस्या, सूचना असल्यास त्या नोंदवण्यासाठी नागरिकांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती.

मात्र, या कालावधीत अवघ्या दोन सूचना पोलीस प्रशासनाला प्राप्त झाल्या. त्यावर अंमलबजावणी करून आता कार्यारंभ आदेश काढला जाणार आहे. त्यानंतर टोइंग वाहने रस्त्यावर कारवाईसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. कारवाई करण्यात आलेली वाहने शरणपूर रोडवरील वाहतूक शाखेच्या युनिट दोनच्या कार्यालयाच्या आवारात जमा केली जाणार आहेत.

असे असेल दंड

  • दुचाकी वाहने : २९० रुपये (टोइंग ९० व शासकीय शुल्क २००)
  • चारचाकी वाहने : ५५० रुपये (टोइंग ३५० व शासकीय शुल्क २०० रू.)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -