घरमहाराष्ट्रनाशिकसंतप्त व्यापारी म्हणतात... आधी पार्किंगचा प्रश्न मार्गी लावा, मगच ट्रायल रन घ्या

संतप्त व्यापारी म्हणतात… आधी पार्किंगचा प्रश्न मार्गी लावा, मगच ट्रायल रन घ्या

Subscribe

रविवार कारंजावरील स्मार्ट जंक्शनविरोधात व्यापारी संघटित

नाशिक – स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अगोदरच नाशिककरांची गैरसोय होत असताना आता शहरातील वर्दळीच्या असलेल्या रविवार कारंजा परिसरात स्मार्ट सिटी विकासांतर्गत जंक्शन उभारण्यात येणार आहे. याकरीता ट्रायल रन घेण्यात येत आहे. मात्र, आता या जंक्शनविरोधात परिसरातील व्यावसायिक एकवटले असून आधी यशवंत मंडईतील बहुमजली पार्किंगचा प्रश्न मार्गी लावा, नंतर जंक्शनचे काम सुरू अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे. यासंदर्भात बुधवारी (दि.१५) व्यापारी वर्गाने स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांची भेट घेत निवेदन दिले.

शहरातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या रविवार कारंजा चौक परिसराचे सुशोभिकरणांतर्गत ट्रॅफिक जंक्शन उभारण्यात येणार आहे. याकरीता गेल्या चार दिवसांपासून ट्रायल रन सुरू आहे. अगोदरच हा परिसर वर्दळीचा असून येथे वेगवेगळ्या प्रकारच्या अतिक्रमणाचा विळखा पडलेला दिसतो. व्यापारी दुकाने, रिक्षा थांबा, बस स्टॉप यामुळे येथून वाहने चालवतांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुळातच रविवार कारंजा परिसरात वाहतुक कोंडी निर्माण होत असतांना या ठिकाणी वर्तुळाकार मातीच्या गोण्या रचून वाहतुक बेट तयार केले आहे.

- Advertisement -

यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. गेली दोन वर्षे कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाले असतांना आता पुन्हा रविवार कारंजा चौकात काम सुरू झाल्यास याचा परिणाम येथील व्यवसायावर होणार असल्याने व्यापारी वर्गाने या कामास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आधी पार्किंगची सुविधा निर्माण करा नंतर जंक्शनचे काम हाती घ्या असे सांगत व्यापारी महासंघाने या कामास तीव्र विरोध दर्शवला. यावेळी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, नाशिक क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पारख, नगरसेविका वैशाली भोसले, सचिन भोसले, प्रमोद चोकसी, प्रसाद चौधरी व व्यापारी उपस्थित होते.

शहरातील रस्ते स्मार्ट झाले, परंतु वाहन पार्किंगची सुविधाच नसल्याने या स्मार्ट रोडच्या सौंदर्याला गालबोट लागले. शहरातील मध्यवर्ती असलेल्या संपूर्ण बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सुटावी, यासाठी रविवार कारंजावरील मोडकळीस आलेली यशवंत मंडईची इमारत पूर्णतः पाडून त्याठिकाणी बहुमजली पार्किंग विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आधी हे काम मार्गी लावावे, नंतरच नवीन कामे हाती घ्यावी, अशी मागणी यावेळी व्यापारी असोसिएशनने केली.

- Advertisement -

स्मार्ट सिटीच्या कामास विरोध नसून स्मार्ट सिटीच्या आतापर्यंतच्या कामाचा अनुभव पाहता अगोदर पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, तसेच व्यापार्‍यांची मते विचारात घेण्यात यावी. रविवार कारंजा येथील जंक्शन कसे विकसित करणार, कामाचा कालावधी आणि त्यामुळे वाहतुकीवर होणारा परिणाम याविषयी सविस्तर सादरीकरण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -