घरमहाराष्ट्रनाशिककांदा लिलावात महिलांना व्यापाऱ्यांकडून विरोध

कांदा लिलावात महिलांना व्यापाऱ्यांकडून विरोध

Subscribe

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकारण करून वातावरण तापवण्याचे काम सुरू

कांदा आणि राजकारण हे समीकरण लासलगावच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते.गेल्या दोन दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत महिला संस्थेला लिलावात सहभागी होण्यावरून जे रणकंदन माजले ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. आशियातील नावाजलेली लासलगाव कांदा बाजरपेठेचे लिलाव बंद पडणे हे काही नवीन नाही. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने बाजार समितीतमध्ये लिलाव ठप्प होत असतात. मुळात महिला संस्थेला लिलावात सहभागी न होऊ देणे हा विषय जरी दिसत असला तरी पडद्याआड वेगळ्या घडामोडी घडत आहे. ‘पर्देमें रहणे दो पर्दा न हटावो’ असाच काहीसा प्रकार सुरू आहे. महिला सभापती अन् उपसभापती असलेल्या कांदा नगरीत महिला संस्थेला विरोध, असा पिक्चर जरी दिसत असला तरी या पिक्चरमागे राजकारण होत असून, याचा व्हिलन मात्र कोण? असा प्रश्न पडलेला आहे.

कृषी साधना संस्थेला लिलावाला परवानगी मिळाल्याने शुक्रवारी प्रत्यक्ष लिलावात सहभाग घेऊन केवळ ६ वाहनातून १०८ क्विंटल कांदा खरेदी केला. शुक्रवारी लासलगाव मुख्य बाजार आवारात जवळपास ३२ हजार क्विंटल कांदा लिलाव पार पडले अन् नाफेड तर्फे या संस्थेने नाममात्र १०८ क्विंटल माल खरेदी केला. म्हणजे ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशीच गत दिसत आहे. किमान सोमवारपासून तरी सदरची संस्था मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करून शेतकरी वर्गाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा.

- Advertisement -

कांद्याची आजवरची राजकीय महती लक्षात घेता या वर्षाअखेर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार असून, या निमित्ताने राजकारण करून वातावरण तापवण्याचे काम सुरू आहे. लासलगाव बाजार समितीत लायसन धारक असलेल्या विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्थेला विरोध दर्शवत व्यापार्‍यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय गुरुवारी घेतला होता. लासलगाव व्यापारी असोसिएशनचे सभासद नसल्याने कांदा लिलावात सहभागी होता येणार नसल्याचे कारण देत कांदा व्यापार्‍यांनी विरोध दर्शविला होता. बाजार समितीमध्ये लिलाव ठप्प होताच नेहमी शेतकरी संघटना याची दखल घेत रस्त्यावर उतरत असत, मात्र कालचा इतका मोठा प्रकार घडूनही शेतकरी संघटना याची दखल घेत नाही असाही प्रश्न या निमित्ताने होत आहे.

कृषी साधना संस्थेला लिलावात सहभागी होण्याची परवानगी न दिल्याने गुरुवारी दुपारून लिलाव ठप्प झाले. साधारण २५० ते ३०० वाहने लिलावापासून वंचित होते. त्यात दुपारून जोरदार पाऊस आल्याने अनेक शेतकरी वर्गाचा कांदा भिजला, मालाची प्रतवारी कमी झाली अन् त्याचा जवळपास १५ ते २० लाखांचा फटका हा बळीराजाला बसला. यांच्या राजकारणाने मात्र कोरोनाच्या कठीण परिस्थितीत शेतकरी वर्गाला आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले.

- Advertisement -

खर्‍या अर्थाने जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर नेमके काय व कुठे चुकते आहे, याचा शोध घेतला पाहिजे. शेतकरी टिकाला तर बाजारपेठ टिकेल. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवून लासलगावचे नावलौकिक कसे वाढेल याचा प्रयत्न सगळ्या घटकांनी केला पाहिजे, या निमित्ताने एवढीच अपेक्षा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -