घरमहाराष्ट्रनाशिक१०३ वर्षांची परंपरा; भक्तांच्या नवसाला पावणारा चांदीचा गणपती

१०३ वर्षांची परंपरा; भक्तांच्या नवसाला पावणारा चांदीचा गणपती

Subscribe

१० दिवस सजवणार विलोभनीय आरास

भक्तांच्या नवसाला पावणारा बाप्पा म्हणून रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीची सर्वदूर ख्याती आहे. १०३ वर्षांची परंपरा जोपासत असलेल्या रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाने यंदा दहा दिवस विविध आरास सजवण्याचा संकल्प केला आहे. भाविकांना मंदिरात येण्यास बंदी असली तरी मंदिराबाहेरुन दर्शनाची व्यवस्था आहे.

रविवार कारंजा म्हटले की, चांदीचा गणपती हे समीकरणच. भाविकांच्या इच्छा, अकांक्षा पूर्ण करणार्‍या या ‘विघ्नहर्त्या’चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमीच वर्दळ असते. कोरोनाच्या पार्शभूमीवर मंदिर बंद असले तरी भाविकांचा हिरमोड होऊ नये, यासाठी येथील गणेशोत्सव मंडळाने बाहेरुनच दर्शनाची व्यवस्था केली आहे. गणपतीचे वाहन म्हणून उंदिरमामाच्या कानात इच्छा व्यक्त केली, तर ती बाप्पा नक्कीच पूर्ण करतो, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात तर भाविकांची मोठी गर्दी होते. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात सजावटीचे काम जोमाने सुरु आहे. मंदिराच्या गाभार्‍यात प्रत्येक दिवशी वेगळी आरास सजवली जाईल. त्यादृष्टीने आता साफसफाईचे कामकाज सुरु आहे. मंदिर परिसरात भगव्या रंगाचा मंडप उभारुन भाविकांना उभे राहून दर्शन घेता येईल, याचे मंडळाच्या वतीने केले जात आहे.

- Advertisement -

१९१७ साली गणेश मंडळाची स्थापना

लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केल्यानंतर जुन्या नाशिकमध्ये व रविवार कारंजा येथील काही भक्तांनी १९१७ मध्ये सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केली. प्रारंभी जुन्या जेलसमोर ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात येत असे. मनोरंजनासाठी मेळ्यांचे आयोजन व कलापथकाचे कार्यक्रम, अन्नदानही येथे केले जात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर या मेळ्यांमध्ये शाहीर कवी गोविंद यांची पदे गायली जाऊ लागली. त्यावेळी रविवार कारंजा मित्र मंडळास सरकारी रोष पत्करावा लागला. त्यामुळे कै. श्रीमान गंगाप्रसाद पन्नालाल हलवाई यांनी सरकारी रोषाची तमा न बाळगता १९२८ साली ‘श्रीं’ची स्थापना आपल्या मिठाईच्या दुकानात केली. त्यानंतर आजपर्यंतची ‘श्रीं’ची स्थापना रविवार कारंजा परिसरात होत आलेली आहे.

आमच्या गणेशोत्सव मंडळाने यंदा 103 वर्षे पूर्ण केले आहेत. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मंदिर बंद राहणार असल्याने भाविकांना बाहेरुन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दहा दिवस विविध प्रकारच्या आरस सजावटीचे काम सुरु आहे. – नरेंद्र पवार, अध्यक्ष, रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -