नाशिक : जुने नाशिक भागातील भद्राकाली परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करणार्या दुकानदारामुळे संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा रात्रभर खंडीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले. महावितरणच्या अधिकारी, कर्मचार्यांनी सुमारे दहा तास वीज पुरवठा कशामुळे खंडीत झाला याचा शोध घेतला असता महावितरणच्या दाराजवळच हा बिघाड सापडला. संबधित दुकानदाराने रस्त्यात गज ठोकल्याने महावितरणची मुख्य लाईन ब्रेक झाल्याचे समोर आले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भद्रकाली येथे फाळके रोड परिसरात भद्रकाली कक्ष क्रमांक ३ हे महावितरणचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या परिसरात मोठया प्रमाणावर दुकानदारांचे अतिक्रमण आहे. अनेक दुकानदारांनी दुकानापुढे रस्त्यात गज खोदून पाल टाकली आहे. महावितरणच्या कार्यालयाबाहेरच असलेल्या पंजाब बेकरी आहे. या दुकानदाराने रस्त्यात पाल टाकून अतिक्रमण केले आहे. शनिवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास जुने नाशिक परिसरातील वीज पुरवठा अचानक खंडीत झाला. काही तांत्रिक बिघाड झाला असेल म्हणून नागरिकांनी बराच वेळ प्रतिक्षा करूनही वीज पुरवठा सुरळित न झाल्याने उकाडयाने नागरिक हैराण झाले.
महावितरणचे सहायक अभियंता शशांक पेंढारकर यांच्यासह पथकाने तांत्रिक बिघाड शोधण्यास सुरूवात केली. संपूर्ण रात्रभर शोध घेऊनही बिघाड सापडेना. अखेर महावितरणच्या भद्रकाली कार्यालयाबाहेरच हा बिघाड सापडला. टाकसाळे प्लाझा समोरील पंजाब बेकरी अनाधिकृत अतिक्रमण असलेल्या जागामालकाने रात्री दहा वाजता त्यांच्या अनधिकृत जागेत दोन फूट गजाचे हुक ठोकल्यामुळे ते रस्त्यावरील व रस्त्याच्या खालील 11 हजार केव्हीची विद्युत मंडळाची मुख्य लाईन ब्रेक झाली, त्यामुळे संपूर्ण भद्रकाली भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याचे निदर्शनास आले. अखेर रविवारी सकाळी साडे सहा वाजता विद्युत पुरवठा सुरळित करण्यात आला. संबंधित अतिक्रमणधारकाविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.