घरमहाराष्ट्रनाशिककेंद्रिय राज्यमंत्री डॉ. पवारांच्या निवासस्थानासमोर आदिवासींचा आक्रोश

केंद्रिय राज्यमंत्री डॉ. पवारांच्या निवासस्थानासमोर आदिवासींचा आक्रोश

Subscribe

केंद्र, राज्य सरकारकडून समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी

नाशिक : नाशिक-मुंबई लाँगमार्च, महसूल कार्यालयावरील लाल वादळ अशा आंदोलनांतून वेळोवेळी आदिवासी प्रश्नांवर आदिवासी बांधवांकडून आवाज उठविण्यात आला. मात्र, केंद्र व राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाकडून आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ आदिवासी बांधवांनी सोमवारी (दि.२७) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या शहरातील निवासस्थानी आक्रोश करत आंदोलन केले.

आदिवासी बांधवांकडून विविध मागण्यांसाठी वारंवार नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनांची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानासमोर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानाबाहेर मग्रूर शासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या कराव्यात, प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, या मागण्यांसाठी आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्याच्या खेड्यापाड्यावरून आपले प्रश्न व मागण्या घेऊन अनेक जण जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. मात्र, त्यांच्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी सेना संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केला. आपल्या विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतल्यावर जिल्हाधिकारी अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मात्र, आंदोलनाला कुठलीही परवानगी नसल्याने गंगापूर पोलिसांच्या वतीने आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -